JPN NEWS ( Voice Of Citizens ) www.jpnnews.in
मुंबई - ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी जगभरात ख्याती मिळविली होती. व्यंगचित्रातून अचूक भाष्य करण्याची त्यांची हातोटी वाखाणली गेली. त्यांच्या कलेपासून भावी पिढीने प्रेरणा घ्यावी, तसेच मुंबईविषयीच्या जाणिवा विद्यार्थ्यांमध्ये वाढाव्यात, हा ‘माझी मुंबई’ बाल चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यामागचा उद्देश आहे. स्पर्धेत भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे चित्राचे परीक्षण करुन भविष्यातील मुंबईचे कसे नियोजन करता येईल, भावी पिढीच्या आपल्या शहराविषयी काय कल्पना आणि अपेक्षा आहेत, हे ओळखण्यासाठी ही स्पर्धा दिशादर्शक माध्यम ठरते आहे, असे उद्गार मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी काढले.
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे मुंबई महानगरांतील सर्व महापालिका शाळांतील तसेच खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारीत आणि महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा २०१५-२०१६ चे उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते महापौर निवासस्थानी आज (दिनांक १० जानेवारी २०१६) करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर आंबेकर म्हणाल्या की, या स्पर्धेतील स्पर्धकांनी साकारलेली चित्रे ही उच्च दर्जाची व दिशा देणारी असतात. बालचित्रकारांना त्यांच्या मनातील चित्रे दिलेल्या विषयांनुसार रेखाटण्यास वाव मिळत असल्याने ही चित्रे महापालिकेसाठी अमूल्य असतात. स्पर्धेतील विजेत्यांची चित्रे बृहन्मुंबईतील योग्य व मुख्य अशा ठिकाणी होर्डिंग्जच्या स्वरुपात झळकावण्यात येतील, जेणेकरुन सर्व मुंबईकरांपर्यंत ती पोहोचावीत. महापालिकेच्या संकेतस्थळावरदेखील ही चित्रे उपलब्ध करुन देण्यात येतील, अशी माहितीही महापौरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
पुढे त्या म्हणाल्या की, परीक्षकांनाही या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट चित्र निवड करणे हे एक प्रकारे आव्हान असते, हा आता अनुभव आहे. या स्पर्धेला प्रतिवर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे. या स्पर्धेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असे महापौरांनी नमूद केले. मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवितांना या स्पर्धेतून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पना, अपेक्षा यांचाही त्यात वाटा असेल, असा आशावादही महापौरांनी व्यक्त केला. अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. पल्लवी दराडे यांची यावेळी मुख्य उपस्थिती होती. या स्पर्धेत संपूर्ण मुंबईतून ५६ हजार ३८८ बालचित्रकारांनी सहभाग घेतला. मुंबई शहर व उपनगरांतील विभागनिहाय एकूण ३९ उद्याने व मैदाने निश्चित करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment