मुंबई / JPN NEWS.in : गृहनिर्माण सहकारी संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत दिले.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मानीव अभिहस्तांतरणासाठी लागणारी कागदपत्रे तसेच प्रक्रिया वेळखाऊ आहे. या प्रक्रियेच्या नियमांमध्ये बदल सुचवून ही प्रक्रिया अधिक जलद व सुटसुटीत होण्यासाठी गृहनिर्माण, महसूल आणि सहकार या तीन विभागातील उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची एक समिती तातडीने नियुक्त करावी. या समितीने सध्याचे नियम व त्यामध्ये आवश्यक असणारे बदल, तसेच या प्रक्रियेसाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात. जेणेकरुन सदनिका खरेदी करणाऱ्यांना याचा लाभ होईल. सहकार विभागाकडे 1 एप्रिल 2015 पर्यंत मानीव अभिहस्तांतरणाची 1900 प्रकरणे प्रलंबित होती. नोव्हेंबर 2015 अखेर 560 नवीन अर्ज प्राप्त झाले असून 30 नोव्हेंबर 2015 पर्यंत 1840 अर्ज निकाली काढण्यात आले असून 620 प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
मानीव अभिहस्तांतरण प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अतुल भातखळकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम गुप्ता, सहकार विभागाचे उपसचिव डॉ. यशवंत गेडाम, सह नोंदणी महानिरीक्षक डॉ. संजय कोलते, मुद्रांक विभागाचे उपसचिव श्यामसुंदर पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment