थकित कर्जाच्या वसुलीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी अवलंबिली मुन्नाभाई एमबीबीएसची शक्कल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

थकित कर्जाच्या वसुलीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी अवलंबिली मुन्नाभाई एमबीबीएसची शक्कल

Share This
मुंबई http://www.jpnnews.in 
"मुन्नाभाई एमबीबीएस" चित्रपटात लोकांना चांगल्या कामासाठी प्रवृत्त करणारी गांधीगिरी दाखवली आहे. अश्याच गांधीगिरीचा वापर करताना बँकेचे कर्मचारी दिसत आहेत. भारतातील विविध बँकांमध्ये डिसेंबर २०१५च्या आकडेवारी नुसार २ लाख ८२ हजार ४३४ कोटी रुपयांची कर्जे थकित आहेत. अश्या थकबाकीदारांकडून कर्जांची वसुली करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी फेडरेशनने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत ८ फेब्रुवारी ते ३१ मार्चदरम्यान हातात गुलाबाचे फुल आणि नोटीस घेऊन कर्मचारी कर्ज थकवणार्‍या ग्राहकांच्या घरी जात आहेत आणि आपले कर्ज फेडण्यासाठी थकबाकीदारांना प्रवृत्त करत आहेत.

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने गुरुवारी पत्रकार परिषद घेत या मोहिमेबाबत माहिती दिली. फेडरेशनचे असिस्टंट सेक्रेटरी अरविंद मोरे म्हणाले की, संघटनेतर्फे राबवण्यात येणार्‍या या अभिनव वसुली अभियानाला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला केवळ १३ फेब्रुवारीपर्यंत मोहीम आखण्यात आली होती. मात्र ग्राहकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून संपूर्ण देशभर ३१ मार्चपर्यंत मोहीम सुरू ठेवण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला आहे. 

विविध बँकांमध्ये डिसेंबर २०१५च्या आकडेवारी नुसार २ लाख ८२ हजार ४३४ कोटी रुपयांची कर्जे थकित आहेत. यापैकी एकट्या बँक ऑफ महाराष्ट्रामधील ग्राहकांकडे ८ हजार ३0२ कोटी रुपयांची कर्जे थकित आहेत. कर्जाचे हफ्ते फेडले जात नसल्याने इतर गरजू लोकांना कर्ज देताना अडचणी येणार आहेत. तसेच बँकांचा पैसा थकबाकीदारांकडे अडकून राहिल्याने बँकांचे व्यवहार करणे अडचणीचे होणार आहे. अश्या परिस्थितीमधून बँकांना बाहेर काढण्यासाठी सदर मोहीम सुरु केली असल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.  

बँकांची थकित कर्जे वसुलीसाठी गांधीगिरीचा वापर केला जात आहे यात कुठेही ग्राहकांना दमदाटी किंवा धमकावण्याचे प्रकार घडणार नाहीत. कामाच्या वेळेनंतरही कर्मचारी मोहिमेत काम करतील, जेणेकरून बँकेत येणार्‍या ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. महत्त्वाची बाब म्हणजे कर्मचारी सार्वजनिक सुट्टय़ांच्या दिवशीही या मोहिमेअंतर्गत कर्जवसुलीसाठी ग्राहकांकडे जाणार आहेत असे मोरे यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस किशोर सावंत, पांडुरंग भोगले, नागेश नाचणकर, अभिषेक दळवी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages