मुंबई - वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी सरकारतर्फे कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आली. ही शस्त्रक्रिया सुरक्षित आणि सुलभ असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला, तरी मुंबईमध्ये 2015-16 या वर्षात ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तब्बल 10 महिलांचा मृत्यू झाला आहे.
"हम दो, हमारे दो‘चा नारा देत सरकारने कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसंदर्भात मोठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेला यशही मिळत आहे. ही शस्त्रक्रिया सुरक्षित असून, अवघ्या काही तासांमध्ये होत असल्याचा दावा केला जातो. पालिकेच्या विविध रुग्णालय व प्रसूतिगृहामध्ये ही शस्त्रक्रिया करताना 2015-16 या वर्षात 10 महिलांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. यामध्ये फुप्फुसाला जंतुसंसर्ग होणे, गर्भपातानंतर जंतुसंसर्ग, हृदयक्रिया बंद पडणे व प्रसूतीदरम्यान गुंतागुंत होणे, सिझरिन शस्त्रक्रियेचा महिलेने घेतलेला धसका अशी मृत्यूची विविध कारणे आहेत. कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेदरम्यान महिलेचा मृत्यू होणे हे योग्य नसल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झालेल्या महिलांबाबत मागवलेल्या माहितीतून हे सत्य उघड झाले आहे. महिलांचे मृत्यू झालेल्या या 10 तील एकाही प्रकरणात तक्रार दाखल केलेली नसून, कायद्यात तशी तरतूदच नसल्याचे माहिती अधिकारात सांगण्यात आले आहे.
पुरुष नसबंदी करण्यासाठी पारितोषिक व मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. "पोस्टर बॉईज‘सारख्या चित्रपटातून नसबंदीसंदर्भात जनजागृती करण्यात आली आहे; मात्र अद्यापही नसबंदी करण्यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यल्प आहे. 2015-16 या वर्षात मुंबईत फक्त 798 पुरुषांनी नसबंदी केली. याउलट 17 हजार 262 महिलांनी कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केली.


No comments:
Post a Comment