मुंबई, दि 21 - बेस्टच्या परिवहन विभागाचा तोटा भरून काढण्यासाठी बेस्टच्या विज ग्राहकांवर आकारण्यात येणारा टीडीएलआर कमी करण्यात यावा अशी मागणी करीत आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि पालिका गटनेते मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या प्रकरणी शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे त्यामुळे आता विज बिले सुमारे 20 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.
बेस्टच्या परिवहन विभागचा तोटा भरून काढण्यासाठी मुंबई बेटावरील बेस्टच्या विज ग्राहकांवरी अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे.प्रतियुनिट हा दर 11. 45 रूपये एवढा असून हा विज ग्राहकांवर होणारा अन्याय आहे. त्यामुळे याचे दर कमी करण्यात यावेत अशी मागणी करीत आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार आणि पालिका गटनेते मनोज कोटक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन या संपुर्ण प्रकरणी चर्चा केली असून हे दर किमान विस टक्कयांनी कमी करण्यात यावे अशी भूमिका भाजपाने मांडली आहे. त्याबाबत शासन सकारात्मक असून एमईआरसीकडे बेस्ट विनंती करून याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. मात्र मुख्यमंत्री मुंबईकरांना नक्की दिलासा देतील असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वीज ग्राहकांना असा होणार फायदा
टीडीएलआरमुळे शहर भागातील बेस्टच्या वीज ग्राहकांचे बिल २५ टक्क्यांनी वाढले होते़ मात्र यामध्ये आता २० टक्के कपात झाल्यास प्रति युनिट ११ रुपये ४५ पैशांऐवजी शहरातील दहा लाख वीज ग्राहकांना आठ रुपये ३० पैसे मोजावे लागतील, असा दावा शेलार यांनी केला आहे़
पाणी चोरी करणाऱयांची चौकशी होणार
मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि पालिका गटनेते मनोज कोटक यांनी आज मुंबईतील पाणी चोरी आणि गळती बाबत पालिका आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली. ती मान्य करत आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले.
मुंबईला दररोज ३७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़ यामध्ये २७ टक्के पाणी वाया जात आहे़ यापैकी १२ ते १५ टक्के पाणी चोरी व गळती होत असून उर्वरित १२ ते १५ टक्के टँकरमाफियांना विकले जात आहे़. अधिकारी आणि राजकीय हस्तक टँकरमाफियांमार्फत या पाण्याची विक्री करीत आहेत़ असे सुमारे ५६३ दशलक्ष लीटर पाणी दररोज तर महिन्याला १६ हजार ८९० दशलक्ष लीटर पाण्याची ३०० टक्के दराने विक्री होत आहे, असा आरोप भाजपाने केला आहे़
टँकरमाफियांची ‘चांदी’
झोपडपट्ट्यांमध्ये प्रति हजार लीटर पाण्यासाठी ३ रुपये ८६ पैसे पालिका आकारत असते़ म्हणजेच दहा हजार लीटर पाण्यासाठी झोपडपट्टीवासीयांना ३९ रुपये मोजावे लागतील़ मात्र टँकरमाफिया या पाण्यासाठी दीड हजार रुपये नागरिकांकडून उकळत आहेत़ इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना प्रत्येक हजार लीटरसाठी चार रुपये ६६ पैसे आकारण्यात येतात़ तेही दीड हजार रुपये देत आहेत़


No comments:
Post a Comment