अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे मार्गदर्शन
मुंबई / प्रतिनिधी
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त ‘ऋणानुबंध अभियान’ तर्फे उद्या शनिवार, दिनांक ३० एप्रिल, २०१६ रोजी सकाळी १० वाजता महापालिका इंजिनिअरींग हब, वरळी येथे ‘प्रबोधन पर्व’ चे उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीतील अमूल्य योगदान’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अभियंते, अधिकारी व कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकीचे कार्य करण्यासाठी ऋणानुबंध अभियानाची स्थापना केली आहे. विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त प्रबोधन पर्वासह ‘ऋणानुबंध अभियान’ने वरळी येथील कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे अनावरण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरील छायाचित्रांचे प्रदर्शन, संविधान कन्या कु. मनश्री आंबेतकर हिचा सत्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ११ पुस्तकांचे संच, १२५/- रुपयात उपलब्ध, विभागवार रक्तदान शिबिर, अवयवदान असे विविध कार्यक्रम आयोजिले आहे. प्रबोधन पर्वाचे उद्घाटन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते सकाळी १०.०० वाजता होणार आहे व दुपारी २.०० वाजता राष्ट्रीय प्रबोधनकार राहुल अन्वीकर यांच्या गीतांचा अविष्कार ‘चलो संविधान की और’ हा कार्यक्रम संपन्न होईल.


No comments:
Post a Comment