ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी ‘बेस्ट’ पासच्या मासिक व त्रैमासिक शुल्कात मिळणार सवलत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ज्येष्ठ नागरिक व अपंगांसाठी ‘बेस्ट’ पासच्या मासिक व त्रैमासिक शुल्कात मिळणार सवलत

Share This
मुंबई / प्रतिनिधी (दिनांक २९ एप्रिल ) - मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्तिंकरीता ‘बेस्ट’ बसने प्रवास करताना मासिक व त्रैमासिक पास शुल्कामध्ये ५० टक्के सवलत मिळण्याकरीता मुंबईच्या महापौरांनी वेळोवेळी प्रशासनाला निर्देश दिले होते. यासोबतच पालिका मुख्यालयात झालेल्या गटनेत्यांच्या सभेत ज्येष्ठ नागरिक धोरण व अपंगांसाठी ‘बेस्ट’ बसने सवलतीत प्रवास करता यावा, यासाठी महापौर  स्नेहल आंबेकर यांनी सतत पाठपुरावा केला, या पाठपुराव्यास यश आले असून दिनांक ०१ मे, २०१६ या महाराष्ट्र दिनी प्रातिनिधीक स्वरुपात ज्येष्ठ नागरिक व अपंगांना महापौरांच्या हस्ते सवलतीच्या पासचे वितरण करुन त्याचा प्रारंभ करण्यात येणार आहे.


ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांकरीता विविध कल्याणकारी धोरण ठरविणारी व राबविणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील पहिली महानगरपालिका आहे. सन २०१५-१६ या अर्थसंकल्पिय वर्षात महापौरांच्या अधिकारातील विकास निधीतून ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी महापौरांच्या पुढाकारातून विशेष तरतूद करण्यात आली. महापौरांनी ज्येष्ठ नागरिक व अपंगांच्या विविध समस्यांच्या अनुषंगाने वेळोवेळी त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनासोबत बैठका घेऊन या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाला योग्य ते निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गटनेत्यांच्या सभेमध्ये ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तिंना ‘बेस्ट’ बसेसमध्ये प्रवासाकरीता शुल्कात सवलत मिळावी, यासाठी प्रभावी चर्चा करण्यात आली. लोकहितार्थ बाब लक्षात घेऊन सर्व गटनेत्यांनीही महापौरांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पिय तरतुदीत मुंबई विद्युत व परिवहन उपक्रमाच्या सेवेत (बेस्ट) अपंग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांना पालिका क्षेत्रात परिवहन उपक्रम अंतर्गत प्रवास करताना मासिक व त्रैमासिक पासात सवलत उपलब्ध करुन देण्यासाठी १० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages