मुंबई दि. २२: राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१५ ते दि. ३१ जानेवारी २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वित्त विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय दि. २२ एप्रिल २०१६ रोजी निर्गमित केला आहे.
राज्य शासनाने दि. ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासन निर्णयान्वये शासकीय कर्मचारी तसेच इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१५ पासून सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनवरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांहून ११९ टक्के केला होता तसेच दि. १ फेब्रुवारी २०१६ पासून महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने देण्यात आली होती. आता शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१५ ते दि. ३१ जानेवारी २०१६ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे.
महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतूदी व कार्यपद्धती आहे, त्याचप्रकारे यापुढे लागू राहिल. हे आदेश सुधारित वेतन संरचनेत वेतन अनुज्ञेय असलेल्या संस्थांमधील कर्मचाऱ्यांना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. वित्त विभागाने आज निर्गमित केलेला हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०१६०४२२११०४४८३१०५ असा आहे.


No comments:
Post a Comment