मुंबई, दि. 27 :- प्रतिनिधी
दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी दर्जेदार बियाणे मोफत देण्यात यावेत, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशा विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन केल्या.
राज्यातील भीषण दुष्काळ व अभूतपूर्व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबतचे निवेदन तटकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, युवक अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार सतीश चव्हाण, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील आदी मान्यवरांचा सहभाग होता.
मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या असून त्या दूर करण्यासाठी उपाययोजनाही सूचवण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त भागात मागणीप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे टॅकर तातडीने उपलब्ध व्हावेत, चारा छावण्यांच्या मागणीनुसार त्यांना मंजूरी मिळावी, त्यांची प्रलंबित देयके तातडीने अदा व्हावीत, शेतकऱ्यांकडून वीजवापर होत नसतानाही देण्यात आलेली वीजबिले माफ करावीत, विविध अभ्यासक्रमांच्या दोन वर्षांपासून प्रलंबित शिष्यवृत्तीची रक्कम त्वरीत देण्यात यावी, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील विद्यार्थी विभागाबाहेर शिक्षण घेत असल्यास, त्यांना शैक्षणिक व परिक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळावा, शैक्षणिक संस्थांनी शैक्षणिक शुल्कवसुलीची सक्ती करु नये व त्यासाठी सवलत देण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात याव्यात, मुंबई, पुण्यासारख्या राज्यातील अन्य शहरातील महानगरांमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या सोयीसुविधांसाठी महापालिकांना विशेष अनुदान देण्यात यावे, मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा पाणीपुरवठा शंभऱ टक्के बंद करावा, दुष्काळग्रस्त भागात बाटलीबंद पाणी भरमसाठ दराने विकले जाते, शुद्ध पाण्याच्या नावाखाली थंड पाणी देऊन फसवणूक होते, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बाटलीबंद पाणीनिर्मितीचे प्रकल्प ताब्यात घेऊन सरकारने पाणीपुरवठा करावा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वारंवार होणाऱ्या मागणीचा विचार करुन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशा अनेक मागण्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
अजित पवार यांचा सरकारवर 'हल्लाबोल'
तत्पूर्वी, राष्ट्रवादीचे विधीमंडळातील पक्षनेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेतते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पक्षप्रवक्ते नवाब मलिक, चित्राताई वाघ, निरंजन डावखरे, संग्राम कोते आदींच्या प्रमुख उपस्थीतीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन, दुष्काळग्रस्ताना मदत करण्याबाबत शासन गंभीर नसल्याचे सांगून शासनाच्या असंवेदनशील वृत्तीवर जोरदार हल्ला चढवला.
अजित पवार यावेळी म्हणाले की, चारा छावण्यांच्या मागण्या आहेत पण त्या दिल्या जात नाहीत. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध केले जात नाहीत, त्यामुळे स्थलांतर वाढले आहे. दुष्काळी गावात टॅंकर देताना जनावरांचा विचारच केला जात नाही. आम्ही रेल्वेने पाणी आणले एवढंच सरकार सांगतंय, परंतु ते पुरेसं नाही. मराठवाड्याच्या अन्य भागातही पाण्याची गरज आहे. परंतु, त्याठिकाणी पाणी पोहचतंच नाही. दुष्काळी भागात शून्य टक्के व्याजाने पिक कर्ज, सवलतीच्या दरात खते आणि मोफत बियाणे उपलब्ध करून दिली पाहिजेत, अशी मागणीही पवार यांनी केली.
तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दुष्काळाकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न केला. सरकारने दुष्काळाकडे गांभीर्याने पहावे अशी मागणी वारंवार केली. दुष्काळनिवारणाच्या उपाययोजना केल्या नाही तर जेलभरोचा इशारा पक्षाने दिला, तरीही सरकारने परिस्थिती गांभीर्याने हाताळली नाही, त्यामुळे दुष्काळी भागातून मुंबई आणि लगतच्या शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. रोजगार हमी योजना नीट न राबवल्याने स्थलांतर वाढले आहे. 15 मे पर्यंत राष्ट्रवादीचे सर्व नेते दुष्काळी भागाचा दौरा करुन जनतेला विश्वास देणार आहेत. तरीही सरकारने उपाययोजना केल्या नाही तर मात्र 15 मे नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही तटकरे म्हणाले.


No comments:
Post a Comment