मुंबईत सिंगल तिकिट सिस्टिम सुरु करणार - सुरेश प्रभू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत सिंगल तिकिट सिस्टिम सुरु करणार - सुरेश प्रभू

Share This
रेल्वे विकासासाठी राज्यात आता महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी
मुंबई, दि. 21 : प्रतिनिधी - मुंबईमध्ये रेल्वे, मेट्रो, मोनो, बेस्ट,शेअर टॅक्सी या सर्व प्रवास सेवांचे एकाच ठिकाणी तिकिट उपलब्ध होण्यासाठी सिंगल तिकिट सिस्टिम सुरु करण्यात येणार आहे. तसेच ही सुविधा मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील रेल्वेचा विकास गतीने करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी’ स्थापन करण्यात येणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून राज्यातील 9 प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असून सुमारे 23 हजार कोटी रूपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथे दिली.


मंत्रालयात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रभू बोलत होते. लातूरला मिरजहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल रेल्वे मंत्री प्रभू यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

प्रभू म्हणाले की, छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनचा विकास करण्यात येत असून त्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या नवीन विकास आराखड्यामुळे  आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुमारे सात हजार लोक थांबू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. हा प्रकल्प राज्यासाठी भूषणावह ठरेल. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा,स्वच्छतागृह, सरकते जिने याचे काम 15 ऑगस्ट पर्यंत सुरु करुन टप्प्या टप्प्याने प्रत्येक स्टेशनला ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मुंबई-दिल्ली अंतर कमी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर टायगोलेन रेल्वे सुरु करण्यात येणार असून यामुळे जवळपास सहा तासांचे अंतर कमी होणार आहे. तसेच राज्यातील 40 स्टेशनचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. सीएसटी ते चर्चगेट हा मार्ग सुध्दा जोडण्यात येणार आहे,असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट’  कंपनी स्थापन करण्यात येणार आहे.  या कंपनीद्वारे महाराष्ट्रातील9 रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. या कंपनीद्वारे सुमारे 23 हजार कोटी रूपयांचे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच यासाठी दर आठवड्याला संबंधित अधिकारी आढावा घेणार असून दर तीन महिन्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल, असेही प्रभू यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे अधिक भक्कम करण्यासाठी अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ, वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा-गडचिरोली,नागपूर-नागभीड, पुणे-नाशिक, मनमाड-धुळे-इंदौर,गडचिरोली-आदिलाबाद, बारामती-लोणंद, कोल्हापूर-वैभववाडी हे मार्ग लवकरच पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून हे प्रकल्प चार वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहेत.

तसेच पनवेल ते सीएसटी रेल्वे आणि रोड असा मल्टिमोडल एलिबेटेड कॉरिडॉर, पहिल्या टप्प्यात बांद्रा ते विरार, दुसऱ्या टप्प्यात बांद्रा ते चर्चगेट असे कॉरिडॉर विकसीत करण्यात येणार आहेत. तसेच हार्बर लाईन वेगवान करण्यासाठी नवीन सिग्नल सिस्टीम विकसित करुन आता त्याचा वेळ दोन मिनिटांवर आणण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार आशिष शेलार, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितिन करीर, मुंबई प्रादेशिक विकास महामंडळाचे आयुक्त यू.पी. एस. मदान,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, सचिव मिलिंद म्हैसकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी,संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages