मुंबई - एखाद्या व्यक्तीच्या अंगावरील सोनसाखळी व इतर मौल्यवान वस्तू हिसकावणाऱ्या गुन्हेगाराना जरब बसावी यासाठी राज्य सरकारने याबाबतची शिक्षेची तरतूद अधिक कडक केली आहे. त्यानुसार अशा प्रकारातील दोषींना किमान दोन व कमाल पाच वर्ष सश्रम कारावास होऊ शकेल. असे करताना दोषीकडून संबंधित नागरिकास दुखापत झाल्यास किमान तीन व कमाल पाच वर्ष सश्रम कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड अशा कडक शिक्षेची तरतूद करण्यासाठी भारतीय दंड संहिता 1860 व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये कलम 379 नंतर कलम 379-अ (1)(2) आणि 379-ब अंतर्भूत करण्याचा निर्णय मंत्रिपरिषदेच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सोने व इतर मौल्यवान दागदागिने चोरून सहजरित्या आर्थिक लाभ मिळविण्याची प्रवृत्ती वाढत आहे. विशेषत: शहरांमध्ये महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून चोरण्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या तक्रारी आहेत. तसेच अशा प्रकारच्या काही घटनांमध्ये काही नागरिकांना आर्थिक नुकसानीबरोबरच जीव देखील गमवावा लागला आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी संबंधित गुन्हेगारांना अधिकाधिक कडक शिक्षा ठोठावण्याची जनभावना होती. त्यानुसार मंत्रिपरिषदेने याबाबत निर्णय घेतला.


No comments:
Post a Comment