मुंबई, दि. 26 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची गरज संपूर्ण देशाला आहे. डॉ.आंबेडकर यांच्या विचारातील भारत घडविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करुया, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
दूरदर्शन वरळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त दूरदर्शन केंद्रामधील सभागृहाचे ‘डॉ.बी.आर.आंबेडकर सभागृह’ असे नामकरण आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचे अनावरण बडोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘भारतीय नागरिक कर्तव्य, हक्क आणि जबाबदारी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा, राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस.थूल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य जयमंगल धनराज, अनुसूचित जाती-जमाती वेल्फेअर असोसिएशनचे ओ.पी.गौतम, निवेदक जयु भाटकर आदी उपस्थित होते.
बडोले म्हणाले की, आज डॉ.आंबेडकराचे विचार देशातच नाही तर जगभर पोहोचत आहेत आणि सर्व स्तरांतून त्यांना स्वीकारले जात आहे, हे एक परिवर्तनच आहे. संविधानाच्या प्रास्ताविकात स्वातंत्र्य, समता, बंधुता याचा उल्लेख आहे. या तत्त्वांच्या पालनासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, अशी भावना बडोले यांनी यावेळी व्यक्त केली.
थूल म्हणाले की, डॉ.आंबेडकर यांचे विचार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आज सर्वत्र स्वीकारले जात आहेत. प्राचार्य जयमंगल धनराज म्हणाले की,मानवी जीवन सन्मानाने जगण्यासाठीचे मूलभूत अधिकार संविधानामुळे आज आपणास प्राप्त आहेत. मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्यांना तसेच समस्त महिला वर्गाला हक्क आणि अधिकार प्राप्त करुन देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ.आंबेडकरांनी केले आहे. मुकेश शर्मा म्हणाले की, डॉ.आंबेडकर हे कोणत्याही एका वर्गाचे नसून, त्यांचे विचार आणि कार्य पाहता ते संपूर्ण देशाचे आहेत.


No comments:
Post a Comment