बसमार्ग बंद करण्यावरून भाजपची कोंडी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बसमार्ग बंद करण्यावरून भाजपची कोंडी

Share This
मुंबई (ता. 29) - मुंबईची लाईफ लाईन असलेल्या बेस्टने शहरातील 52 हून अधिक बसमार्ग तोट्यात चालत असल्याचे कारण देत बंद केल्याचे पडसाद आज महापालिका सभागृहात उमटले. बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाविरोधात कॉंग्रेसचे विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी सभागृहात झटपट सभा तहकुबीची मागणी केली. त्याला शिवसेनेने साथ देऊन भाजपला अडचणीत आणले. बेस्ट समिती भाजपाच्या ताब्यात असल्याने सभा तहकुबी झाल्यास आपल्या पक्षाची नाचक्की होईल म्हणून सभागृहात आम्हाला या विषयावर बोलायचे आहे असे सांगत सभा तहकुबील विरोध करून कामकाज बराच वेळ ताणून धरले. मात्र विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी टाकलेल्या जाळ्यात भाजपाला पकडण्याची नामी संधी चालून आल्याने महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. 

महाराष्ट्र दिनापासून मुंबईतील 52 बसमार्ग बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बंद होणाऱ्या बसमार्गापैकी निम्म्याहून जास्त बससेवा शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमार्फत सुरू केल्या होत्या. त्यामुळे बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयावरून शिवसेनाही संतापली होती. विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सभागृहात बेस्ट उपक्रमाच्या या निर्णयाविरोधात झटपट सभा तहकुबीची मागणी केली. या तहकुबीला भाजपने विरोध करण्याचा प्रयत्न केला; मात्र थेट विरोध केला, तर भाजपच्या सांगण्यावरूनच मार्ग बंद झाल्याचा संदेश मुंबईकर नागरिकांपर्यंत पोहचेल. त्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाली. महापौर स्नेहल आंबेकर यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना बोलण्यास सांगितले असता फणसे यांनी या झटपट तहकुबीला पाठिंबा दिल्यामुळे कोणतीही चर्चा न होता कामकाज स्थगित झाले. 

बेस्ट समितीचे अध्यक्षपद भाजपकडे आहे. झटपट सभा तहकुबीवर फक्त एकाच सदस्याला विरोध किंवा पाठिंबा देता येतो. भाजपने या तहकुबीला विरोध केला असता, तर बेस्ट प्रशासनाच्या निर्णयाला विरोध असल्याचे चित्र निर्माण झाले असते आणि पाठिंबा दिला असता, तर प्रशासनावर भाजपचा अंकुश नसल्याचा संदेश विरोधकांनी पसरवला असता. अशा कात्रीत भाजप सापडली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages