मुंबई - नव्या विकास आराखड्यानुसार 80 लाख रोजगारनिर्मितीचे लक्ष्य असताना "बिझनेस कॅपिटल‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) कार्यालये पाण्याअभावी बंद होण्याची वेळ आली आहे. टॅंकरमालकांनी महापालिकेविरोधात पुकारलेल्या संपामुळे आज एका मल्टिनॅशनल कंपनीचे कॉर्पोरेट कार्यालय बंद ठेवण्यात आले. येत्या काळात अशीच परिस्थिती राहिल्यास मुंबईच्या कार्पोरेटजगतावर पाणीबाणी ओढावण्याची भीती वर्तविली जात आहे.
अपुऱ्या पावसामुळे मुंबईत पाणीकपात करण्यात आली आहे. मुंबईत 20 टक्क्यांपासून 50 टक्क्यांपर्यंत पाणीकपात लागू आहे. त्यामुळे कॉर्पोरेट कार्यालयांना रोजची पाण्याची गरज भागविण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागते. एकट्या वांद्रे कुर्ला संकुलात रोज तब्बल 200 टॅंकर पाण्याचा पुरवठा केला जातो; मात्र गेल्या तीन दिवसांपासून टॅंकरमालकांनी महापालिकेच्या कारवाईविरुद्ध संप सुरू केल्याने बहुसंख्य इमारतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शुक्रवारी एका कॉर्पोरेट कार्यालयाचे कामकाज बंद ठेवण्यात आले. टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठासुद्धा थांबल्याने एका कॉर्पोरेट कार्यालयाच्या मालकाने येथील कामकाज पाहणाऱ्या कंपनी व्यवस्थापनासोबत बैठकसुद्धा घेतली. त्यात बाहेरून पाणी मागविण्याचा निर्णय झाला. अशीच परिस्थिती राहिल्यास देशाची कमर्शियल डिस्ट्रिक्ट म्हणून ओळख असलेल्या बीकेसीतील कार्यालये बंद ठेवण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या पाणीसमस्येचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला असता, देशातील आघाडीच्या टेलिकम्युनिकेशन कंपनीचे कार्यालय उद्यापासूनच बंद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. या कार्यालयाला दररोज दीड लाख लिटर पाण्याची गरज भासते. सध्या पालिका अवघे 50 हजार लिटर पाण्याचा पुरवठा करते. उर्वरित गरज टॅंकरच्या पाण्यावर भागवली जाते. आज कसेबसे निभावले; पण उद्या जर टॅंकरने पाणी नाही आले, तर इमारत बंद करावी लागेल, अशी माहितीसुद्धा या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिली.
कॉर्पोरेट कार्यालयांबरोबरच शहरातील बांधकाम व्यवसायालाही या टॅंकरच्या संपाचा फटका बसला आहे. मुंबईत सध्या अडीज ते तीन कोटी चौरस फुटाचे बांधकाम सुरू आहे. पाणी नसल्याचा परिणाम या बांधकामाला बसत असल्याचे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंटचे राजन बांदेकर यांनी सांगितले.
टॅंकरमाफियांच्या संपाबाबत मंगळवारी (ता.26) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे बैठक झाली होती. त्यानंतर पालिकेने सुरू केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे; तसेच, टॅंकरमालकांना पाणीपुरवठ्याची परवानगी घेण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ही समस्या आता संपली आहे. त्यामुळे आता टॅंकरने पाणीपुरवठा होण्यास हरकत नाही. मात्र, परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न टॅंकरमालकांकडून सुरू असल्याचा आरोपही या अधिकाऱ्याने केला.
का सुरू आहे संप
बोअरवेल अथवा विहिरींचे पाणी ज्या भागात आहे तेवढ्याच भागात वापरण्याची परवानगी आहे; मात्र टॅंकरवाले हे पाणी काळ्या बाजारात विकत असल्याची तक्रार भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेकडे केली होती. त्यानंतर पालिकेने अशा पाण्याच्या विक्रीवर बंदी आणली. त्याविरोधात टॅंकरमालकांनी तीन दिवसांपासून संप पुकारला आहे.


No comments:
Post a Comment