मारेकऱ्यांना शोधणार आहात की दाभोलकर, पानसरेंचे स्मृतिदिनच साजरे करायचे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मारेकऱ्यांना शोधणार आहात की दाभोलकर, पानसरेंचे स्मृतिदिनच साजरे करायचे

Share This
मुंबई - ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला अनेक महिने उलटल्यानंतरही त्यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात सीबीआय; तसेच अन्य तपास यंत्रणांना अपयश आले आहे. तुम्ही दाभोलकर, पानसरेंच्या मारेकऱ्यांना शोधणार आहात, की लोकांनी त्यांचे स्मृतिदिनच साजरे करायचे का असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी तपास यंत्रणांना केला.
तीन वर्षांपूर्वी दाभोलकर यांची पुण्यात; तर दोन वर्षांपूर्वी पानसरे यांची कोल्हापूरमध्ये हत्या झाली. या दोघांच्याही मारेकऱ्यांचा शोध सीबीआय; तसेच राज्य सरकारने नियुक्त केलेले विशेष तपास पथक घेऊ शकलेले नाहीत. याबाबत दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेबरोबरच पत्रकार केतन तिरोडकर यांच्या जनहित याचिकेवर न्या. एस. सी. धर्माधिकारी यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणी झाली. घडलेल्या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून व्हायला हवा; पण येथे केवळ गुन्ह्यांमधील साम्य तपासण्यातच वेळ जात आहे. मग तपास पूर्ण कधी होणार? तुम्ही मारेकऱ्यांना शोधणार, की केवळ न्यायालयात अहवालच दाखल करणार, अशी विचारणा खंडपीठाने केली. दरम्यान, पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडवर स्थानिक न्यायालयात आरोप निश्‍चित करण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यामुळे आता हा खटला लवकरच सुरू होऊ शकेल. दाभोलकर, पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पद्धत एकच आहे. त्यामुळे पानसरे व दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली काडतुसे एसआयटीने सीबीआयकडे दिली आहेत. ते मध्यवर्ती न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत, असे सरकारी वकील संदीप शिंदे यांनी सांगितले. मात्र, अजूनही या मुद्द्यावरच तपास सुरू असल्याबाबत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. तपासाबाबत पुढील आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने तपास यंत्रणांना दिले. या प्रकरणांतील आरोपी गायकवाडने दाखल केलेला अर्जही न्यायालयाने निकाली काढला. याचिकादारांच्या वतीने ऍड. अभय नेवगी यांनी बाजू मांडली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages