मुंबई, दि. २६ : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी केंद्र शासनाने अधिक निधी उपलब्ध करुन द्यावा, असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाचे सचिव परशुरामन अय्यर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. अय्यर यांनी काल मंत्रालयात मंत्री लोणीकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
मंत्री लोणीकर म्हणाले की, राज्यात मागील काही वर्षे सातत्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे गावांमधून पाणीपुरवठा योजनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. राज्य शासनाने ७५० कोटी रुपयांच्या टंचाई आराखड्यास मान्यता दिली असून ५०० कोटी रुपयांचे जिल्हाधिकाऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. यात टँकरने पाणीपुरवठा करणे, निकृष्ट पाईपलाईन बदलणे, जळालेले पंप बदलणे, टाक्यांचे लिकेज काढणे अशा विविध ९ उपाययोजनांसाठी हा निधी वापरुन लोकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. याशिवाय राज्यातील जास्तीत जास्त गावांना पाणीपुरवठा योजना देता येणे शक्य व्हावे यासाठी राज्य शासनाने आपली स्वतंत्र अशी ‘मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना’ सुरु केली आहे. पुढील चार वर्षात या योजनेतून २ हजार ५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून अधिकचा निधी पुरवणी मागण्यांमधून उपलब्ध करुन दिला जाणार आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीत लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून जुन्या योजनांची कामे पूर्ण करण्यास सांगितले असून सध्या नवीन योजनांना यातून मंजुरी मिळत नाही. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता विशेष बाब म्हणून राज्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून नव्या योजनांची कामे हाती घेण्यास परवानगी देण्यात यावी, असेही मंत्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले. सचिव अय्यर यांनी यावेळी मंत्री लोणीकर यांनी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा सकारात्मक विचार करुन महाराष्ट्राला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.
एका वर्षात 9 लाख शौचालयांचे बांधकाम
यावेळी राज्यात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाविषयीही चर्चा झाली. या अभियानाच्या राज्यात होत असलेल्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सचिव अय्यर यांनी कौतूक केले. मंत्री लोणीकर म्हणाले की, राज्यात मागील एका वर्षात 9 लाख शौचालये बांधण्यात आली आहेत. राज्याची आतापर्यंतची ही सर्वात प्रभावी कामगिरी आहे. राज्यात अजून साधारण ४४ लाख शौचालये बांधावयाची आहेत. सर्व कुटुंबांना वैयक्तिक शौचालय उपलब्ध करुन देऊन संपूर्ण राज्य लवकरच हागणदारीमुक्त आणि स्वच्छ करु, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सचिव अय्यर यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्राला केंद्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.


No comments:
Post a Comment