मुंबई, दि. 26 : वाढत्या नागरिकरणामध्ये स्मार्ट सिटी संकल्पना राबविण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगासोबतच पायाभूत सुविधा विकसित करण्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. तसेच स्मार्ट सिटी उभारण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
इंडिया टेक फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ट्विन कॉनक्लेव्ह - रेन्यूटेक अँड टी - डी आणि दुसऱ्या स्मार्ट सिटी अँड कनेक्टिव्हिटी’ या परिषदेचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातील सहसचिव संतोष वैद्य, टेक इंडिया गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन पी. उमाशंकर, राज्याचे माजी मुख्य सचिव व्ही. रंगनाथन, फाउंडेशनचे अध्यक्ष इंद्र मोहन,आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात तसेच मुंबईमध्ये नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे सांगून देसाई म्हणाले की, सध्या नागरीकरण वाढत आहे. देशात 50 टक्के नागरिक आता शहरांमध्ये राहत असून 2050 पर्यंत 70टक्क्यांहून अधिक गावांचे नागरिकरण होईल. त्यामुळे जुन्या गावांना स्मार्ट सिटी करण्याची प्रक्रिया वेगात होणार आहे. नागरीकरण होत असताना स्मार्ट सिटीमध्ये आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच पुरेसा पाणी पुरवठा, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सुलभ वाहतूक व्यवस्था, वायू व जल प्रदुषणमुक्त परिसराबरोबरच नागरिकांना नोकरी, व्यवसायाच्या संधी मिळणे आवश्यक ठरणार आहे. तसेच जुन्या शहरांचे पुनर्विकास करतानाही या सोयीसुविधा देण्याची गरज आहे. वाढत्या नागरिकरणाला सुविधा पुरविण्यसाठी नवनव्या कल्पना समोर यायला हव्यात.
प्रत्येक शहराची स्वतःची एक वेगळी ओळख आणि त्यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्या शहराची गरज ओळखून व त्याची ओळख जपून तज्ज्ञांनी विकास करण्यासाठी नियम, अथवा आराखडा तयार करावा लागणार आहे. लंडन शहराने तसेच अमेरिकेने हे करुन दाखविले आहे. जुन्या शहरांचे स्मार्ट सिटीमध्ये रुपांतरित करताना भरपूर आव्हाने आहेत. परंतू नागरिकांचा सहभाग घेऊन हे आव्हान पेलता येईल, असेही त्यांनी सांगितले.
देसाई म्हणाले की, राज्यात उद्योग विभागाने एकात्मिक औद्योगिक शहरे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्ट मार्गाने ही शहरे विकसित करण्यात येत आहेत. तसेच माहिती तंत्रज्ञान पार्क आणि वस्त्रोद्योग पार्कही उभारण्यात येत आहेत. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर अंतर्गत औरंगाबाद येथे स्मार्ट औद्योगिक शहर उभारण्यात येत असून त्यासाठी 4 हजार एकर जागा संपादित केली आहे. त्याच्या पायाभूत सुविधा निर्माणाचे काम सुरू आहे. स्मार्ट औद्योगिक व वाणिज्यिक शहरे विकसित करण्याचे काम उद्योग विभागामार्फत होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


No comments:
Post a Comment