मुंबई - नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाणाऱ्या महिलांना अडवण्यात आल्याने देवस्थानच्या विश्वस्त समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या न्यायाधीश ऊर्मिला जोशी-फलके यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला आहे. न्यायमूर्ती असूनही अध्यक्ष न्यायालयाचेच आदेश मानत नाहीत, मुख्यमंत्र्यांनीही याची गंभीर दखल घ्यावी, असे त्या म्हणाल्या.
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी बुधवारी स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्या गेल्या होत्या. मात्र, त्यांनी ओले कपडे घातलेले नसल्याने ग्रामस्थ महिलांनी त्यांना अडवले. यावेळी बाचाबाची होऊन एक महिला भोवळ येऊन पडली. याचा निषेध करत भूमाता ब्रिगेडने पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महिलांना मंदिरात प्रवेश देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र या मंदिराचे विश्वस्त त्याचे पालन करत नाहीत. मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष ऊर्मिला जोशी-फलके या नाशिक जिल्हा न्यायाधीश आहेत. त्याच या आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांचा राजीनामा घ्यावा यासाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देसाई यांनी दिला. पोलिसांसमोर महिला कार्यकर्त्यांबाबत झालेल्या प्रकाराची दखल गृह विभागाची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment