मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वे आणि बेस्टला संबोधले जाते. मुंबईची पहिली लाईफलाईन असलेल्या रेल्वेचे प्रवासी वाढत असताना दुसरी लाईफलाईन असलेल्या बेस्टच्या प्रवासी संखेत घट होत चालली आहे. मुंबईमधील ट्राफिक ही मोठी समस्या असल्यामुळे बस वेळेवर पोहचत नसल्याने प्रवासी कमी होत असल्याचे कारण दिले जात आहे. प्रवासी कमी होण्यामागे हे एक कारण असले तरी बेस्टची गेल्या २ ते ३ वर्षात केली गेलेली दरवाढ यामुळे प्रवासी संख्या मोठ्या संखेने कमी झाले हे मुख्य कारण आहे.
बेस्टचे तिकीट कमी असताना ४५ लाख प्रवासी बेस्टमधून दररोज प्रवास करत होते. बेस्टने दरवाढ करताच हळू हळू हि संख्या कमी होत आली आहे. आणि सध्या बेस्टने प्रवास करणाऱ्यांची संख्या २७ लाखावर आली आहे. मुंबई महानगरपालिकेचा अंगीकृत उपक्रम असलेल्या बेस्टमध्ये
शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. बेस्टवर सातत्याने २५ वर्षे शिवसेना भाजपाची सत्ता असताना बेस्ट डबघाईला आली आहे. बेस्टवर तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हा कर्जाचा बोजा सातत्याने वाढत चालल्याने बेस्टला आपले दैनंदिन व्यवहार करणे कर्माचाऱ्यांना पगार देणे मुश्किल झाले आहे.
बेस्टकडून आपल्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर कमी करण्यासाठी वेळोवेळी प्रवाश्यांना गृहीत धरून टार्गेट केले आहे. बेस्ट बसने प्रवास न करता स्वतःच्या खाजगी एसी गाड्यांमधून फिरणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या बेस्ट समितीमधील सदस्यांनी बस दरवाढ केली तरी बेस्टने प्रवास करणारे प्रवासी कमी होणार नाही असे मत सातत्याने मांडल्याने प्रशासनाने दरवाढीचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. विरोधी पक्षाने दरवाढीला केलेला विरोध आणि बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी उत्पन्नाचे इतर आर्थिक स्त्रोत उभे करण्याचे केलेल्या सूचना याकडे प्रशासन आणि सत्ताधाऱ्यानी दुर्लक्ष केले आहे.
बेस्टच्या तिकिटांची मागील वेळी दरवाढ करताना टप्यांचे अंतर कमी करत जास्त तिकीट दर आकारण्यास मंजुरी देण्यात आली. कमी अंतराला तिकिटाचे जास्त भाडे द्यावे लागणार असल्याने आणि आपला वेळ वाचावा म्हणून प्रवाश्यांनी शेअर रिक्षा आणि ट्याक्सीचा पर्याय निवडला आहे. प्रशासनाच्या चुकीच्या पद्धतीने भाडे आकारण्यास सत्ताधारी पक्षाने मान्यता दिल्याने कमी अंतराचे प्रवासी लाखोंच्या संखेने कमी होत गेले आहेत. प्रवासी कमी होत असल्याने बेस्टच्या उत्पन्नावरही याचा परिणाम होत आहे.
बेस्ट समिती गेले कित्तेक वर्षे शिवसनेच्या ताब्यात होती. यावर्षी महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना बेस्ट समिती भाजपाच्या ताब्यात दिली आहे. बेस्ट समिती ताब्यात आल्यावर अध्यक्ष असलेल्या मोहन मिठबावकर यांनी तसेच महाव्यवस्थापक जगदीच पाटील यांनी कमी अंतराचे (फिडर रूट) , एसी आणि इतर बसचे लांब पल्ल्याचे भाडे वाढ कमी करून प्रवासी संख्या वाढवणार असल्याचे सांगितले होते. अशी दरवाढ लवकरच कमी केली जाइल अशी अपेक्षा असताना फक्त लांब पल्यामध्ये नव्या टप्प्यांचा समावेश केला आहे. कमी अंतराच्या भाड्यात कोणताही बदल केलेला नाही.
बेस्टची दरवाढ कमी करण्याचे नाटक करताना प्रशांसनाने टप्यांची सुधारणा करत त्यासाठी नवे दर लागू केले आहेत. यामुळे बेस्टकडे लांबच्या पल्ल्याचे प्रवासी आकर्षित होणार असले तरी जवळच्या अंतरावर प्रवास करणारे प्रवासी बेस्टकडे आकर्षित होणार नाहीत. जवळच्या अंतरावर प्रवास करणारे प्रवासी रिक्षा आणि ट्याक्सीकडे वळले आहेत अश्या प्रवाश्यांना पुन्हा बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी काहीही करण्यात आलेले नाही. त्यातच बेस्टने १ मे पासून तब्बल ५२ बेस्टचे मार्ग बंद केले आहेत. बेस्टमार्ग बंद केल्याने बेस्ट समिती आणि पालिका सभागृहात याचे तीव्र पडसाद उमटले आहे.
पालिका सभागृहात विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी बेस्टमार्ग बंद करण्याविरोधात सभातहकुबी मांडली होती. महापौर स्नेहल आंबेकर यांनीही भाजपाकडून शिवसेनेची केली जाणारी कोंडी, वेळोवेळी शिवसेनेला गोत्यात आणण्याचे प्रकार याचा वचपा काढण्यासाठी भाजपाची गोची करत सभातहकुब केली. नगरसेवकांच्या संतप्त भावना महापौरांनी बेस्टच्या महाव्यवस्थापकाना पत्राद्वारे कळविल्या असून बंद केलेले बस मार्ग पुन्हा सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेच्या पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही बस मार्ग बंद करू देणार नाही असे सांगितले आहे.
महापौर आणि सत्ताधारी पक्षाच्या पक्ष प्रमुखांनी बस मार्ग बंद करू नका असे सांगितले असले तरी बेस्ट बस मार्ग बंद केले आहेत. जे बस मार्ग बंद केले आहेत त्यापैकी बहुतेक बस मार्ग हे शिवसेना नगरसेवकांच्या विभागामधून जाणारे आहेत. यावरून भाजपाचा बेस्ट समिती अध्यक्ष येताच शिवसेनेला आणखी गोत्यात आणले जात आहे असेच म्हणावे लागेल. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख् यमंत्र्यांना भेटून बेस्टला आर्थिक मदत देण्याची आणि टीडीएलआर रद्द करण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी नकार दिला असला तरी भाजपाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटताच बेस्टला आर्थिक मदत देण्यास आणि टीडीएलआर रद्द करण्यास मुख्यमंत्र्यांनी तयारी दर्शवली आहे. यावरून शिवसेनेची पुन्हा गोची झाली आहे.
जे बसमार्ग बंद केले आहेत यावरून येणाऱ्या दिवसात पुन्हा सताधारी शिवसेना आणि भाजपा आमने सामने येणार आहे. कमी अंतराचे भाडे वाढ कमी करून फिडर रूट वरील ( ७ ते ८ किलोमिटर ) प्रवाश्यांना बेस्ट कडे आकर्षित करण्याची मागणी असताना भाजपाने प्रशासनाला हाताशी धरून फक्त लांब पल्ल्याच्या प्रवाश्यांचा विचार केलेला आहे. भाजपाला कमी अंतराच्या प्रवाश्यांना कोणताही दिलासा देता आलेला नाही. यामुळे प्रवासी संखेत कोणताही मोठ्या प्रमाणात बदल दिसणार नसल्याने बेस्टला काहीही फायदा होणार नाही. भाजपाने रिक्षा आणि टयाक्सीकडे वळलेले कमी अंतराचे प्रवासी वाढवण्यासाठी कमी अंतराचे भाडे वाढ कमी केली तरच बेस्टचे प्रवासी वाढून उत्पन्नात भर पडेल याचे भान ठेवावे
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३


No comments:
Post a Comment