मुंबई २ मे २०१६ - बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्षा यामिनी जाधव यांनी आज (दिनांक ०२ मे, २०१६) सकाळी मुंबई शहरातील माहिम येथील गोपी टँक मंडई, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई आणि स्वर्गीय मॉसाहेब मीनाताई ठाकरे मंडई यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी या मंडयांची दुरुस्ती व स्वच्छतेबाबत चोख काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
बाजार व उद्यान समितीच्या अध्यक्ष म्हणून यामिनी जाधव यांची निवड झाल्यानंतर समिती अंतर्गत सातत्याने बैठका घेऊन प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करीत आहेत. जाधव यांनी सहाय्यक आयुक्त (बाजार) संजय कुऱहाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत शहरातील तीन मंडयांची आज सकाळी पाहणी केली. यावेळी गोपी टँक मंडईच्या दुरुस्ती व स्वच्छतेच्या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जाधव यांनी प्रशासनाला दिले.
दादर येथील वीर सावरकर मंडई येथे पत्रे बदलण्याबाबत व नादुरुस्त पंखे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने प्रशासनाला निर्देश दिले. तसेच जेथे आवश्यकता आहे तेथे सुरक्षा रक्षक नेमण्याचे निर्देशही त्यांनी दिले. स्वर्गीय मॉसाहेब मीनाताई ठाकरे मंडई येथे दिलेल्या भेटी प्रसंगी फुल मंडई व मासळी बाजार यांचीही पाहणी करुन स्वच्छतेसह अन्य बाबींवर जाधव यांनी संबंधित अधिकाऱयांसमवेत चर्चा केली.


No comments:
Post a Comment