'जी दक्षिण' विभागातील बंद पडलेली ७०० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी कार्यान्वित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'जी दक्षिण' विभागातील बंद पडलेली ७०० मिमी व्यासाची पर्जन्य जलवाहिनी कार्यान्वित

Share This
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'जी दक्षिण' विभागांतर्गत येणा-या दीपक चित्रपट गृहाजवळील गावडे चौक परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७०० मिमी व्यासाची पर्जन्यजल वाहिनी आहे. ही वाहिनी गाळ साचत गेल्यामुळे बंद झाली होती. या पर्जन्यजल वाहिनीत साचलेला गाळ आता काढण्यात आला असून ती पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सोबतच याच वाहिनीच्या बाजूला ६०० मिमी व्यासाची एक अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनी बसविण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. यामुळे येत्या पावसाळ्यात गावडे चौक, ना. म. जोशी, सेनापती बापट मार्ग इत्यादी परिसरातील पावसाच्या पाण्याचा लवकर निचरा होण्यास मदत होणार आहे.


बृहन्मुंबई परिसरात पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभारणे, पर्जन्यजल वाहिन्या बसविणे आदी कार्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या `पर्जन्यजल वाहिन्या' या खात्याद्वारे प्राधान्याने केली जातात. यांतर्गत गावडे चौकात पूर्वीच बसविण्यात ७०० मिमी व्यासाची ३० मीटर लांबीची पर्जन्यजल वाहिनी मोठ्या प्रमाणात गाळ साचत गेल्यामुळे बंद झाली होती. या पर्जन्यजल वाहिनीत साचलेला गाळ आता काढण्यात आला आहे. ज्यामुळे आता ही वाहिनी पुन्हा कार्यान्वित झाली आहे. या वाहिनीची पर्जन्यजल निःसारण करण्याची अधिकतम क्षमता ही दर सेकंदाला ५३० लीटर (०.५३ क्युबीक मीटर) इतकी आहे.

त्याचबरोबर याच वाहिनीच्या बाजूला ६०० मिमी व्यासाची व ३० मीटर लांबीची एक अतिरिक्त पर्जन्यजल वाहिनी बसविण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे. ज्यामुळे या परिसरातील पडणा-या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. या अतिरिक्त वाहिनीची पर्जन्यजल निःसारण करण्याची कमाल क्षमता ही दर सेकंदला ३४० लीटर (०.३४ क्युबीक मीटर) असणार आहे.
गावडे चौकात कार्यान्वित करण्यात येत असलेल्या दोन्ही पर्जन्यजल वाहिन्या अंतीमतः डॉ. ऍनी बेझंट मार्गावरील 'लव्ह ग्रोव्ह पंपींग स्टेशन'शी संबंधित आहेत. या दोन्ही पर्जन्यजल वाहिन्यांमुळे येत्या पावसाळ्यात गावडे चौक, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग इत्यादी परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे. या दोन्ही पर्जन्यजल वाहिन्यांबाबत कार्यवाही सुरु असताना वाहतूकीला अडथळा होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. ही कार्यवाही महापालिकेच्या रस्ते खात्याद्वारे रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीतच करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages