दोषी कंत्राटदारांना पुलांची कामे - मनसेचा महापौरांना घेराव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोषी कंत्राटदारांना पुलांची कामे - मनसेचा महापौरांना घेराव

Share This
मुंबई - रस्ते दुरुस्ती गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या कंत्राटदारांना मुंबईत चार पूल उभारण्याची 227 कोटी रुपयांची कामे दिल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नगरसेवकांनी गुरुवारी (ता.5) मुंबई पालिका मुख्यालयात महापौर स्नेहल आंबेकर यांना घेराव घातला. जनतेच्या पैशांचा अपव्यय टाळा, दोषी कंत्राटदारांना कामे देणे बंद करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, आदी मागण्या या नगरसेवकांनी या वेळी केल्या. त्यानंतर याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन महापौरांनी त्यांना दिले. 

रस्ते गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या मे. आरपीएस इन्फ्राप्रोजेक्‍ट्‌स आणि मे. जे. कुमार इन्फ्रा या कंत्राटदारांना हॅंकॉक पुलासह शहरात चार पूल उभारण्यासाठी 227 कोटी रुपयांचे कंत्राट देण्याचा निर्णय पालिकेच्या स्थायी समितीने घेतला आहे. या निर्णयास विरोध दर्शवण्यासाठी पालिकेतील मनसेचे माजी गटनेते दिलीप लांडे यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांना घेराव घातला. 

पालिका प्रशासनाने या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या सहा कंत्राटदारांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असताना या दोन दोषी कंत्राटदारांना कामे देऊन मुंबईकरांच्या डोळ्यात धूळफेक केली जात आहे, असा आरोप लांडे यांनी केला. यापुढे दोषी कंत्राटदारांना कामे दिल्यास पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

स्थायी समितीत झालेला हा निर्णय चुकीचा असल्याचे मत महापौरांनी या वेळी व्यक्त केले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन चौकशी करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मनसेने पालिका आयुक्त अजोय मेहता यांनाही पत्र पाठवून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages