महाराष्ट्र केवळ आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध राज्य - मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्र केवळ आर्थिकच नव्हे तर सांस्कृतिकदृष्ट्याही समृद्ध राज्य - मुख्यमंत्री

Share This
मुंबई, दि. 5 : देशाच्या एकूण प्रगतीत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. देशाची आर्थिक राजधानी असा मुंबईचा लौकिक आहे. केवळ आर्थिकच नव्हे सांस्कृतिकदृष्ट्याही महाराष्ट्र हे समृद्ध राज्य आहे. नो इंडिया’ (Know India Programme) या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांना महाराष्ट्र निश्चितच आवडेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.  


जगभरातील विविध देशांत राहणा-या भारतीय वंशाच्या तरुणांना भारताची ओळख व्हावी या दृष्टीने केंद्र शासनाच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने नो इंडिया कार्यक्रम’ (Know India Programme)आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी या उपक्रमात सहभागी झालेल्या तरुणांशी संवाद साधला. पर्यटन राज्यमंत्री राम शिंदे, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, पर्यटन संचालक सतीश सोनी आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, अजिंठा- वेरूळसारखा प्राचीन वारसा, गडकिल्ले, जंगले अशा निसर्गसंपन्नतेसह उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन अशा विविध क्षेत्रांत महाराष्ट्र आघाडीवर आहे.  महाराष्ट्रासह भारतात उद्योग, गुंतवणूकीच्या मोठ्या संधी आहेत. मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जगभरातील उद्योजक महाराष्ट्रासह देशात गुंतवणूक करत आहेत.
            
सध्या महाराष्ट्रापुढे दुष्काळाचे आव्हान आहे.तथापि, हे आव्हान पेलण्यासाठी शासनाने दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला असून,  त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
             
या उपक्रमात दक्षिण आफ्रिका, म्यानमार, इस्त्रायल, इजिप्त, मॉरिशस, मलेशिया, नेदरलँडस्, श्रीलंका, त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशांतील भारतीय वंशाचे तरुण सहभागी झाले असून, ते 14 मे 2016 पर्यंत महाराष्ट्रातील विविध स्थळांना भेट देणार आहेत. महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांनी उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages