रस्ते घोटाळ्याची चौकशी एसीबीकडे सुपूर्द करण्याची मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्ते घोटाळ्याची चौकशी एसीबीकडे सुपूर्द करण्याची मागणी

Share This
मुंबई : रस्ते कामांमध्ये केवळ १४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा पालिकेच्या दाव्याला भाजपाने आव्हान देत, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्ष शिवसेनेला अडचणीत आणले आहे़ रस्त्यांच्या कामांमध्ये पाच हजार कोटींहून जास्त रकमेचा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे़ या घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे सुपूर्द करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे भाजपाने केली आहे़

३४ रस्त्यांच्या कामामध्ये सरासरी ५३ टक्के अनियमितता असल्याचे उजेडात आले आहे़ गेल्या तीन वर्षांमध्ये साडेसात हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे आली आहेत़ त्यामुळे हा घोटाळा सुमारे अडीच ते तीन हजार कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़ या प्रकरणी ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा नोंदविणे, काळ्या यादीत टाकणे आणि नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली़ मात्र, पोलीस ठाण्यात तक्रार करताना हा १४ कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे़
यावरून ठेकेदारांना वाचविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा आता पालिका वर्तुळात रंगली आहे़ भाजपाने पालिकेच्या दाव्याला आव्हान देत, या घोटाळ्यातून ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप केला आहे़ हा घोटाळा सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज व्यक्त करीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची चौकशी सोपविण्याची मागणी भाजपाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे़ 
के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन हे ठेकेदार आणि थर्ड पार्टी आॅडिटर एसजीएस आणि आयआरएस या कंपनीला काळ्या यादीत टाकाणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे़. या घोटाळ्यामध्ये ठेकेदारांपासून, अधिकारी व थर्ड पार्टी आॅडिटरही गुंतले असल्याचे पहिल्या टप्प्यातील चौकशीत उजेडात आले़ रस्ते व दक्षता विभागातील अनेक अधिकारी यात गुंतल्याने त्यांची जबाबदारी आता निश्चित करण्यात येणार आहे़. त्याचबरोबर आणखी दोनशे रस्त्यांच्या कामांची छाननी होणार आहे़ त्यामुळे सुमारे तीन हजार कोटींच्या या घोटाळ्यातून आणखी काही धक्कादायक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे़ २०१३ ते २०१५ मध्ये दुरुस्त करण्यात आलेल्या रस्त्यांची चौकशी यात होणार आहे़
रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यात रस्ते व दक्षता खात्यातील अधिकारी अपयशी ठरले आहेत़ या घोटाळ्यात दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपप्रमुख अभियंता, प्रमुख अभियंता असे मोठ्या प्रमाणात अधिकारी गुंतले आहेत़ सर्व प्रथम रस्ते विभागाचे तत्कालीन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे़ मात्र, मुरुडकर यांना नालेसफाई घोटाळ्याप्रकरणी यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे़

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages