मुंबई, दि. 7 : गेल्या काही वर्षांपासून कमी झालेले पावसाचे प्रमाण आणि त्यातून निर्माण झालेल्या टंचाईच्या परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. राज्यात सुमारे 3798 गावात,6217 वाड्यांवर एकूण 4883 टँकर सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः टंचाईवर केलेल्या उपाययोजनांचा दैनंदिन आढावा घेत आहेत.
मराठवाड्यासह राज्याच्या ज्या भागात पाणीटंचाई आहे, त्या ठिकाणी पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी कोणतीही कसूर ठेवू नका,पाणीपुरवठा प्राधान्याने करा असे स्पष्ट निर्देश राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मराठवाड्यात सुमारे 2503 गावात, 922 वाड्यांवर 3338 टँकर सुरू आहेत. तसेच कोकण विभागात 76, नाशिक विभागात 912, पुणे विभागात 354, अमरावती विभागात 191 तर नागपूर विभागात 12 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ती दूर करण्यासाठी मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यासाठी शासनाचे जोमाने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या मदतीसाठीही मुख्यमंत्री सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
टंचाई निवारणासाठी राज्यातील जिल्हा प्रशासनाने सूक्ष्म नियोजन केले असून जिल्ह्यातील टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनतेला मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा,या दृष्टिकोनातून जनतेला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीसाठे असलेल्या खाजगी विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनाही याबाबत सतर्क राहून टंचाई निवारणाच्या कामांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गरजेच्या ठिकाणी तात्काळ उपाय योजना मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माहिती मुख्यमंत्री घेत आहेत.राज्यात जलयु्क्त शिवार योजनाही प्रभावी राबविण्यात येत आहे. सामाजिक संस्थांची मदतही या कामी होत आहे. अशा अनेक उपाय योजना आणि लोकसहभागाच्या जोरावर दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

No comments:
Post a Comment