मुंबई, दि. 4 : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती देण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्याच्या सूचना कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी काल संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्रालयातील परिषद सभागृहात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर आणि अमरावती विभागातील (आयटीआय) औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यावेळी पाटील बोलत होते. राज्यभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले, आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यास विद्यार्थी इच्छुक असून याकडे त्यांचा कलही आहे. मागच्या वेळेला प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. परंतु यापुढे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये तसेच प्रवेश पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.
प्रवेश प्रक्रिया 10 ऐवजी 15 दिवस राबवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याकरता विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जास्त ओढ असते. परंतु प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन असल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांना त्यांचा फटका बसतो. यावर उपाययोजना म्हणून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची अर्ज स्विकारण्याची मुदत 10 दिवसांऐवजी 15 दिवस करण्यात यावीत. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जर प्रवेशासाठी जागा रिक्त असतील तर त्यासाठी ऑफलाईन पध्दतीने प्रवेश करण्यात यावेत, असे निर्देशही डॉ. पाटील यांनी यावेळी दिलेत.
विद्यावेतनाची मर्यादा 500 रुपयांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 20ते 40 रु. विद्यावेतन दिले जाते. परंतु हे विद्यावेतन पुरेशे नसल्यामुळे या विद्यावेतनाची मर्यादा रु.500 पर्यंत करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. विद्यावेतन वाढीचा हा प्रस्ताव कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने तयार केला असून तो वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठविलेला आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
तासिका तत्वावरील शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत सकारात्मक
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिकवणी वर्गांकरिता तासिका तत्वावर नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या मानधन वाढीबाबत शासन सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करुन मार्ग काढला जाईल, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment