मुंबई : लोकल, मेल-एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करताना तृतीयपंथीयांकडून प्रवाशांकडे पैसे मागितले जातात. काही वेळा बळजबरीही केली जाते. यासंदर्भात प्रवाशांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेत मध्य पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना ट्रेनमध्ये ‘नो एन्ट्री’देण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नियोजन सुरु केले आहे. यासाठी आरपीएफकडून तृतीयपंथीयांच्या प्रमुखालाच भेटून तसे आवाहन करण्यात येणार आहे.
दहा दिवसांपूर्वीच विद्याविहार ते कुर्ला दरम्यान विशेष मोहीम घेवून १३ तृतीयपंथीयांना पकडले होते. यानंतर आता आम्ही वेगळे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहोत व त्यावर कामही सुरु आहे. त्यांच्याकडून ट्रेनमध्ये चढण्यासाठी तसेच उतरण्यासाठी होत असलेल्या स्थानकांच्या वापराची माहीती घेतली जात आहे. ठाणे,कळवा, विटावा, कल्याण पत्रीपुल, मस्जिद स्थानक ते परेल, दातिवली या स्थानक आणि हद्दीत त्यांचा वावर अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. मेन लाईनबरोबरच त्यांचा वावर असलेल्या हार्बरवरील स्थानकांचीही माहिती घेत आहोत, असे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले. पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांना २00 ते ४00 रुपयांपर्यंत दंड होतो. त्यांना रेल्वे न्यायालयातही हजर केले जाते आणि यात दंड वाढतोही, तर काही वेळा त्यांना तुरुंगात जावे लागते. मात्र, त्यांची कमाई खूपच जास्त असल्याने ते दंड भरून मोकळे होतात आणि पुन्हा आपले काम सुरू करत असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment