मुंबई, दि.7: रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दर्जेदार सुविधा देण्यासोबत त्यांच्याशी संवाद साधणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये आरोग्य सेवेबाबत असलेल्या शंका दूर करुन जिल्हा रुग्णालय हे ‘आपलं रुग्णालय’ आहे अशी संकल्पना रुजविणे गरजेचे आहे. जोपर्यंत ही संकल्पना सर्व सामान्यांच्या मनात रुजणार नाही तोपर्यंत परिवर्तन होणे शक्य नाही त्यामुळे सर्वांनी रुग्णालयात स्वच्छतेला प्राधान्य देऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले.
सह्याद्री अतिथीगृहात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संयुक्त विद्यमाने ‘कायाकल्प’ पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार सोहळ्यास आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका श्रीमती आय.ए. कुंदन, आरोग्य सेवा संचालक डॉ. मोहन जाधव, सहसंचालक डॉ. शशिकांत जाधव व सर्व जिल्ह्यांतील जिल्हा शल्य चिकित्सक यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सेवा, स्वच्छता, सोयी सुविधा पुरविणारे सातारा जिल्हा रुग्णालय राज्यस्तरीय‘कायाकल्प’ पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले आहे. तर द्वितीय पुरस्कार नंदूरबार जिल्हा रुग्णालयाने पटकवला असून हे पुरस्कार आज आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
विजेत्यांचे अभिनंदन करत डॉ. सावंत म्हणाले की, ‘कायाकल्प’ ही योजना सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरु झाली. केंद्र सरकारच्या वतीने ही योजना संपूर्ण देशभरात राबविली जात आहे ही बाब कौतुकास्पद आहे. आज आरोग्य विभाग ‘संकल्प निरोगी महाराष्ट्राचा ’ हे ध्येय घेऊन पुढे मार्गक्रम करत असताना याची माहिती सर्वसामान्यांनाही झाली पाहिजे अशा दृष्टीने राज्यातील सर्व रुग्णालयांनी या संकल्पनेत योगदान दिले पाहिजे,असे आवाहनही डॉ. सावंत यांनी यावेळी केले.
आतापर्यंत आरोग्य विभागात अनेक परिवर्तन झाले आहेत. या पुढील काळात अशीच विकासात्मक कामे आपल्याला करायची आहेत. रुग्णालयांच्या इमारतींचा कार्पोरेट देखावा न आणता स्वत:मध्ये बदल घडवून आणल्यास अनेक बदल घडतील, असे सांगून ते म्हणाले की, आरोग्य विभागावर नेहमी टीका केली जाते. अशा टिकेला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर रुग्णालयांनी चांगले काम लोकांच्या स्मरणात आणून दिलं पाहिजे. येणाऱ्या भविष्यकाळात अधिक चांगल काम करा त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी स्वच्छता अभियानाच्या धर्तीवर देश पातळीवरील रुग्णालय तसेच राज्यपातळीवरील रुग्णालयातील स्वच्छतेबाबत ‘कायाकल्प’ योजना सुरू करण्यात आली. याअंतर्गत रुग्णालयातील स्वच्छतेबाबत विविध मापदंड ठेवण्यात आले. जसे रूग्ण तपासणी, रुग्णांच्या मुलाखती, रुग्णालयाची आतील तसेच परिसर स्वच्छता, वैद्यकीय जैविक कचऱ्याची विल्हेवाट, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलाखती, कर्मचाऱ्यांचे मुल्याकंन अशी विविध स्तरावर तपासणी करण्यात आली. याकरिता रुग्णालयातील प्रमुखांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. ज्या रुग्णालयांनी सर्व मापदंडांना पूर्ण केले त्यांना आज पुरस्कृत करण्यात आले.
पुरस्काराचे स्वरुप :राज्यस्तरीय पुरस्कार
जिल्हा रुग्णालय सातारा- प्रथम पुरस्कार- रुपये 50 लाख, मानचिन्ह, प्रमाणपत्र
जिल्हा रुग्णालय नंदूरबार- द्वितीय पुरस्कार-रुपये 20 लाख, मानचिन्ह, प्रमाणपत्र
प्रोत्साहनपर पुरस्कार
जिल्हा रुग्णालय नाशिक, रत्नागिरी, पुणे यांना प्रत्येकी रुपये 3 लाख, मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सन 2016-17 या आर्थिक वर्षात ‘कायाकल्प ’ उपक्रम राज्यात सर्व जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, महिला रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबविण्याचे निश्चित केले आहे.

No comments:
Post a Comment