मुंबई, दि. 2 मे, 2016 : मुंबई शहरात सुमारे 16 हजार जुन्या इमारती आहेत. यापैकी धोकादायक असलेल्या सुमारे 1000 इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट म्हाडाने करून घ्यावे. त्यामुळे इमारती कोसळून नागरिकांच्या मृत्यूचे प्रकार थांबू शकतील, असे मत मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.
ग्रँटरोड, कामाठीपुरा येथील तीन मजली इमारत ‘गुलमोहर’ शनिवारी कोसळली. घटनास्थळाला देसाई यांनी आज भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी स्थानिक आमदार अमीन पटेल, अग्निशमन दलाचे प्रमुख रहांदळे, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्वसन मंडळाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी भांगे व म्हाडाच्या इतर अधिकारी उपस्थित होते.
जुन्या इमारतींच्या दुरूस्तीसाठी केवळ 3 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा असल्यामुळे इमारतीच्या मजबुतीकरणाची अपेक्षा करणे अवाजवी आहे. आजच्या घडीला मुंबई शहरातील अशा जुन्या इमारतींची दुरूस्ती प्रत्येकी 3 लक्ष रुपयांच्या मर्यादेत केली जात आहे. या सर्व कामांचा लोकप्रतिनिधी, महापालिका व म्हाडाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे पुनर्विचार करावा, असे श्री. देसाई यांनी तेथे उपस्थित असलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी व शासनाच्या अधिकाऱ्यांना चर्चेअंती सुचविले.

No comments:
Post a Comment