राजावाडीच्या प्रमुख विद्या ठाकुर आणि महेंद्र वाडीवाला यांना निलंबित करा
मुंबई,दि. ५ (प्रतिनिधी) – महापालिका प्रशासनाला अंधारात ठेवुन ऑर्थर रोड तुरुंगातील एका कैद्याला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात चार महिने ठेवण्याच्या प्रकाराचे आरोग्य समितीत जोरदार पडसाद उमटले. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई करत नाही, तोपर्यंत समितीचे कामकाज चालु देणार नसल्याचा इशारा देत सर्वपक्षीय सदस्यांनी सभेचे कामकाज तहकुब केले. तर राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. विद्या ठाकुर आणि उपनगरीय रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. महेंद्र वाडीवाला यांना याप्रकरणी निलंबित करण्यात यावे अशी मागणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना भेटुन केली.
आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम, आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. शुभा राऊळ आणि शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. शेखर चंद्रशेखर हा आरोपी गेली चार महिने राजावाडी रुग्णालयात उपचार घेत आहे. याची रुग्णालय प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनाही माहित नसल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याने याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या मुद्द्याला सर्वांनी पाठिंबा देत सभा तहकुब केली, असे सांगतानाच रस्ते घोटाळा प्रकरणात अभियंत्यांना निलंबित करता मग या प्रकरणातही वाडीवाला आणि ठाकुर यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी शुभा राऊळ यांनी केली. तर तुरुंग प्रशासनाची जी ऑर्डर दाखवली जात आहे. त्यात कुणाची सही शिक्का नसल्याने ही ऑर्डरच बनावट वाटत असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला.तसेच केवळ मुंग्या आल्याचे कारण देत त्याला रुग्णालयात अॅडमिट करण्यात आल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी दिली. हा सर्वप्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणुन दिला असुन याप्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
आर्थिक संगनमताची चौकशी व्हावी महापालिका प्रशासनाला अंधारात ठेवुन या आरोपीला चार महिने राजावाडीत ठेवण्यात आले. आर्थिक संगनमताशिवाय हे होऊच शकत नसल्याने या प्रकरणाची चौकशी करताना त्याच्या आर्थिक संगनमताचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी केली.

No comments:
Post a Comment