पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डयांची महापौरांसह पदाधिकाऱयांनी केली पाहणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डयांची महापौरांसह पदाधिकाऱयांनी केली पाहणी

Share This
बृहन्मुंबई क्षेत्रांतील रस्ते हे विविध प्राधिकरणांच्या अखत्यारित असून आपापल्या अखत्यारितील रस्त्यांची डागडुजी त्या  त्या प्राधिकरणांनी करावयाची असते. तथापि, मुंबईतील इतर प्राधिकरणांच्या रस्त्यांवरील खड्डयांबाबतही सरसकट महापालिकेला जबाबदार ठरविले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिका आपल्या अधिकार क्षेत्रातील रस्ते सुस्थितीत व खड्डेमुक्त राखण्यासाठी नेहमीच तत्पर असते, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी केले.


पश्चिम द्रुतगती महामार्गावर खेरवाडी जंक्शन ते दहिसरपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील मुख्य व सेवा रस्त्यांची मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार व माजी महापौर सुनील प्रभू, सभागृह नेता तृष्णा विश्वासराव, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, स्थापत्य समिती (उपनगरे) चे अध्यक्ष अनंत नर, सार्वजनिक आरोग्य समितीचे अध्यक्ष प्रशांत कदम, नगरसेवक दीपक भूतकर, अनिल त्रिंबककर, उदेश पाटेकर, नगरसेविका पूजा महाडेश्वर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप विभागीय अभियंता जे. देठे, महापालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत आज (दिनांक ८ जुलै, २०१६) दुपारी पाहणी करण्यात आली, यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महापौर स्नेहल आंबेकर या बोलत होत्या.

पश्चिम द्रुतगती महामार्गावर व आसपास पावसामुळे खड्डे निर्माण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापालिकेकडे नोंदविल्यानंतर हा पाहणी दौरा आयोजित केल्याचे सांगून महापौर म्हणाल्या की, प्राप्त तक्रारींपैकी नेमके किती रस्ते महापालिकेशी संबंधित अथवा इतर प्राधिकरणांच्या अखत्यारित आहेत, खड्डयांची स्थिती तसेच ते बुजविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना यांचा आढावा घेत असल्याचे महापौरांनी नमूद केले.

मुंबईतील रस्ते आणि वाहतूक समस्यांबाबत सर्व संबंधित प्राधिकरणांची संयुक्त बैठक निमंत्रित करण्याविषयी आपण मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली असल्याचे महापौरांनी नमूद केले. महापालिका आपल्या अखत्यारितील रस्त्यांचे परिरक्षण करण्यास बांधिल असून त्याकरीता योग्य व नवीन तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, यंत्रणा यांची मदत घेत आहे. त्याचप्रमाणे इतर प्राधिकरणांनीही आपापली जबाबदारी योग्यपणे पार पाडावी, असे महापौर शेवटी म्हणाल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages