मुंबई 25 Aug 2016 : प्रतिनिधी
सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातानंतर पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. मुंबईत 150 पेक्षा जास्त उड्डाणपूल, रेल्वे मार्गावरील पूल, पादचारी पूल व भुयारी मार्ग 30 ते 40 वर्षे जुने तर 15 ते 20 पूल 60 ते 70 वर्षे जुने आहेत. त्याशिवाय उर्वरित पूल व भुयारी मार्ग 8 ते 10 वर्षे जुने आहेत. त्यामुळे सरसकट 314 पूल व भुयारी मार्गाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या पुलांची आठ सल्लागारांमार्फत तपासणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.
या तपासणीत भू-सर्वेक्षण, भूस्तर चाचणी, पुलांचा आराखडा, पूल कधी बांधला, त्याच्या दुरूस्तीच्या खर्चाचे अंदाजपत्रक, पुलाचा मसुदा, संकल्पचित्र, स्थळ निरीक्षणे आदी कामे करण्यात येणार आहेत. सल्लागारांचा अहवाल सहा महिन्यांत सादर करण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर धोकादायक पुलांची दुरूस्ती करायची की त्याची पुनर्बांधणी करायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार 2017-18 च्या अर्थसंकल्पात पुलांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या पूल विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले.
दरम्यान महालक्ष्मी येथील धोकादायक पुलाचा मुद्दा मनसेचे नगरसेवक संतोष धुरी यांनी स्थायी समितीत उचलला. 2004 पासून या पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. पण त्याकडे पालिकेने लक्ष दिलेले नाही. यावर संरचनात्मक तपासणीसाठी कंत्राटदार मिळाला नसल्यामुळे पुलाचे काम रखडल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. मात्र आता या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No comments:
Post a Comment