मुंबई 23 Aug 2016 : समाजात अवयवदानाला चालना मिळावी तसेच गरजूंना वेळेवर आवश्यक अवयव उपलब्ध व्हावेत यासाठी कार्यक्रम हाती घेऊन दि. 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत ‘अवयवदान जागृती महाअभियान’राबविण्यात येणार आहे. यासाठी www.dmer.org व www.ztccmumbai.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या महाअभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केले आहे.
अवयवदान जागृती महाअभियानासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात आढावा बैठक झाली. त्यावेळी महाजन यांनी हे आवाहन केले. यावेळी आयुषचे संचालक डॉ. के.आर. कोहली,जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने, जे.जे. मार्डचे सचिव डॉ. स्वप्निल मेश्राम, अध्यक्ष डॉ. पी. सतपत्ते यांच्यासह मुंबईतील विविध रुग्णालयांचे वैद्यकीय प्रमुख उपस्थित होते.
महाअभियानासंदर्भात कार्यक्रमाचा आढावा घेऊन महाजन म्हणाले की, या अभियानाचा शुभारंभ मुंबई मरिन ड्राईव्ह येथे 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7.30 वाजता राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी जागृती महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 2.30 ते 3.30 वाजता मंत्रालयात अवयवदानासंदर्भात चर्चासत्र, माहितीपटाचे प्रदर्शन, पथनाट्यांचे सादरीकरण होणार आहे. तत्पूर्वी 29 ऑगस्ट रोजी मंत्रालयातील परिसरात जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या विद्यार्थ्यांच्या अवयवदान विषयावरील चित्रकलेचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. 1 सप्टेंबर रोजी मुंबई विद्यापीठात अवयवदात्या कुटुंबांचा सत्कार समारंभ होणार आहे. तसेच यावेळी अवयवदान अभियान नोंदणी शिबिराचे उद्घाटन व महाअवयदान नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अवयवदानाला समाजात चालना मिळावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाने वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती यांच्यावतीने हे महाअवयवदान संपूर्ण राज्यात एकाच वेळी तालुका ते राज्यस्तरापर्यंत राबविण्यात येणार आहे. या महाअभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले.
या महाअभियानासंदर्भात माहितीसाठी १८००२७४७४४४ आणि १८००११४७७० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment