मुंबई 23 Aug 2016 : दहीहंडी उत्सवासंदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे दहीहंडी उत्सव मंडळानी पालन करण्याचे आवाहन गृह विभागाने केले आहे. दहीहंडी उत्सवासंदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशांचे पालन दहीहंडी उत्सव मंडळ व संयोजकांनी करुन दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दहीहंडी उत्सव साजरा करताना गोविंदाच्या आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात योग्य त्या उपाययोजनांवर संयोजकांनी भर देण्याबरोबरच आवश्यक त्या यंत्रणांची परवानगी घ्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले आहे.
दहीहंडी उत्सव साजरा करण्यासंदर्भात न्यायालयाने दिलेले निर्देश :
· दहीहंडीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त असू नये.
· संयोजकांनी गोविंदांना हेल्मेट, सुरक्षा बेल्ट, कुशन पुरवावेत.
· दहीहंडीत भाग घेणाऱ्या गोविंदांची नावे, पत्ता, फोटो व वयाचा दाखला संबधित अधिकाऱ्यांना द्यावा.
· गोविंदाच्या विम्याची माहिती द्यावी.
· मंडळांनी वैद्यकीय प्रथमोपचाराची व रुग्णवाहिकेची सोय करावी तसेच यासंदर्भात मंडळांनी हमी पत्र द्यावे.
· दहीहंडी उत्सवाची जागेची माहिती आगाऊ संबधितांना द्यावी.
· राज्य शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या मोबाईल रुग्णवाहिकेचा वापर संयोजकांनी करावा.

No comments:
Post a Comment