मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत सूर्यनमस्कार बंधनकारक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2016

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत सूर्यनमस्कार बंधनकारक

मुंबई 23 Aug 2016 - मुंबई महानगरपालिकेच्या शाळांत सूर्यनमस्कार आणि योगासने सक्तीची करण्याच्या ठरावाच्या सूचनेला मंगळवारी पालिका सभागृहात मंजुरी मिळाली. महापालिका शाळांमध्ये मुस्लिम आणि मागासवर्गीय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिकत असल्याने सूर्यनमस्कार आणि योगासने सक्तीची करण्याच्या भाजपच्या या छुप्या अजेंड्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षाने तीव्र विरोध केला. सभागृहात या विषयावर चर्चा सुरु असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने अखेर भाजपाने आणलेल्या प्रस्तावाला साथ देत आवाजी मतदानाने पालिका सभागृहाची मंजुरी मिळवून दिली.

सूर्यनमस्कार आणि योगासने महापालिकेच्या शाळांत सक्तीचे करण्याची ठरावाची सूचना पालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी मांडली. त्यावर मंगळवारी सभागृहात भाजपा आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्ष यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी या ठरावाच्या सूचनेला कडाडून विरोध केला. पालिकेच्या शाळांत विविध धर्मीय विद्यार्थी आहेत. सूर्यनमस्कार हे हिंदू धर्माशी निगडित असून इतर धर्मीय विद्यार्थ्यांवर सक्ती कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. 

ही ठरावाची सूचना हा राज्यघटनेने दिलेल्या स्वातंत्र्यावरील घाला आहे. त्यामुळे "सूर्यनमस्कार‘ ऐच्छिक करावा अशी मागणी शेख यांनी केली. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात धार्मिक बाबींचा अंतर्भाव करून धर्मा-धर्मात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असून शिक्षण क्षेत्राचे भगवीकरण करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा आहे, ज्या प्रस्तावामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते असे प्रस्ताव सभागृहात चर्चेला यायलाच नको असा नियम असताना आणि भारतीय संविधानाने नागरिकांना आपल्या धर्माप्रमाणे आचरण करण्याचे अधिकार दिला असताना ही ठरावाची सूचना फेटाळावी, अशी मागणी त्यांनी केली. 

विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी सूर्यनमस्कार आणि योगासने ऐच्छिक करावीत, अशी उप सूचना केली. कॉंग्रेसचे मोहसीन हैदर यांनी अशा प्रकारचा सक्तीचा प्रस्ताव आणू नये. त्यामुळे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षता या तत्त्वाला बाधा येते, असे मत मांडले. मनसेचे संदीप देशपांडे यांनी लहान मुलांबाबत युनिसेफ या जागतिक संघंटेनेने केलेल्या नियमांचे उल्लंघन करून सूर्यनमस्कार आणि योगासने सक्तीचे करण्याचे योग्य नसल्याने ठरावाच्या सूचनेला विरोध करत मुलांना त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे शिक्षण देण्याचे आवाहन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी सूर्यनमस्कार आणि योगासनावर चर्चा करण्यापेक्षा विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, शालेय वस्तू, कपडे इत्यादी बाबत चर्चा केली असती तेर योग्य ठरले असते असे सत्ताधाऱ्यांना सुनावले. 

सूर्यनमस्कार आणि योगासनावर सभागृहात चर्चा होत असताना भाजपा एकटी पडली होती. सत्तेतील मित्र पक्ष शिवसेनेनेही शांत बसून बघ्याची भूमिका घेत होता. मात्र प्रस्ताव मंजुरीसाठी आल्यावर शिवसेनेने युती धर्माचे पालन केले आणि आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. सन २००५ मध्ये पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना योगासने सक्तीचे करावी असा प्रस्ताव नगरसेविका जोत्सना दिघे यांनी मांडला होता. त्याला पालिका सभागृहाने मान्यता दिली असली तरी अद्याप त्याला राज्य सरकारने परवानगी दिलेली नाही. असे असताना पुन्हा एकदा पालिकेच्या शाळांत प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार आणि योगासने करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad