मुंबई / प्रतिनिधी 21 Aug 2016 - अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मातंग समाज संघाचे संस्थापक बाबासाहेब गोपले यांंचे रविवारी सकाळी बॉम्बे हॉस्पिटल मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
मूळचे मराठवाड्यातील असलेल्या गोपले यांचा विद्यापीठ नामांतर, पँथर तसेच रिडल्स आंदोलनात सहभाग होता. शरद पवार यांच्याशी त्यांची जवळीक होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना महामंडळाचे अध्यक्ष केले होते. मातंग समाजाला आंबेडकरी चळवळीत आणण्यासाठी त्यांंनी प्रयत्न केले.
लक्ष्मण ढोबळे यांच्या उदयामुळे राष्ट्रवादीतील गोपले यांचे स्थान संपुष्टात आले होते. त्यानंतर ते शिवसेनेच्या जवळ गेले. अनुसूचित जमातीमधले ८ टक्के आरक्षण मातंग समाजाला विभागून द्यावे, याबाबत गेली पाच वर्षे ते आंदोलन करत होते. आझाद मैदानात सलग तीन वर्षे त्यांनी धरणे धरले होते.
भारतीय टायगर सेना, भारतीय बहुजन आघाडी या संघटनाही त्यांनी स्थापन केल्या होत्या. संघटनांचा उपयोग त्यांंनी सामािजक कामांसाठी अधिक केला. क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन होण्यामागे गोपले यांचा मोठा वाटा होता. या आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासाठी त्यांनी अनेकवेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
रमेश बागवे, लक्ष्मण ढोबळे, रमेश कदम या नेत्यांच्या उदयानंतर गोपले यांना राजकीय पक्षांनी दूर केले. गेली अनेक वर्षे ते राजकारणात सक्रीय नव्हते. त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दु:ख व्यक्त केले आहे. गोपले यांच्या मागे त्यांची पत्नी कुसूम आणि दोन मुली आहेत. त्यांच्यावर मानखुर्द येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment