न्या. डॉ. मंजूला चेल्लूर यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

न्या. डॉ. मंजूला चेल्लूर यांनी घेतली मुख्य न्यायाधीशपदाची शपथ

Share This
मुंबई / प्रतिनिधी - २२ ऑगस्ट २०१६
कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावरून बदलीवर आलेल्या न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली.

राज्यपालांच्या पत्नी विनोदा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभेचे सभापती हरिभाऊ बागडे, कॅबिनेट मंत्री विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, राम शिंदे, जयकुमार रावल, महादेव जानकर, राज्यमंत्री दीपक केसरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या काळजीवाहू मुख्य न्यायाधीश विजया कापसे ताहिलरामाणी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, वरिष्ठ शासकीय अधिकारी व इतर मान्यवर शपथविधीला उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी मुख्य न्यायमुर्तींच्या नियुक्तीची अधिसूचना वाचून दाखविली. राष्ट्रगीताने शपथविधीची सुरुवात व सांगता झाली.

दिनांक ५ डिसेंबर १९५५ रोजी बल्लारी येथे जन्मलेल्या मंजुळा चेल्लूर यांनी बल्लारीच्या महिला महाविद्यालयातून कला स्नातक ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी १९७७ साली त्यांनी बंगलोर येथील रेणुकाचार्य विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. सन १९७८ साली त्यांनी वकिलीची सुरुवात केली. बल्लारी येथे प्र्याक्टिस करणाऱ्या त्या पहिल्या महिला वकील होत्या. अनेक बँका, कृषी उद्योग व संस्थांच्या विधी सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. दिनांक १५ एप्रिल १९८८ रोजी त्यांनी कर्नाटक न्यायिक सेवेत प्रवेश केला व जिल्हा न्यायाधीश झाल्या. त्याच वर्षी त्यांना इंग्लंडच्या वार्विक विद्यापीठाची फेलोशिप मिळाली. 


दिनांक २१ फेब्रुवारी २००० रोजी त्यांची कर्नाटक मुख्य न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश (प्रथम महिला) म्हणून नियुक्ती झाली व त्यानंतर लगेचच १७ ऑगस्ट २००० रोजी त्यांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. सन २००८ ते २०१० या काळात त्या कर्नाटक ज्युडीशियल अकादमीच्या अध्यक्षा होत्या. कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्षा असताना न्या. चेल्लूर यांनी तृतीय पंथीयांच्या कल्याणासाठी उल्लेखनीय कार्य केले. दिनांक २६ सप्टेम्बर २०१२ रोजी त्यांची केरळ उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली. दिनांक ३ मार्च २०१३ रोजी बिजापूर येथील कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाने त्यांना त्यांच्या विधी क्षेत्रातिल योगदानाबद्दल डी लिट ही मानद पदवी प्रदान केली.  दिनांक ५ ऑगस्ट २०१४ रोजी त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाची शपथ घेतली व आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages