मुंबई 23 Aug 2016 : ''बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्ते सुरक्षा (Road Safety) विषयक गुणवत्तापूर्ण सकारात्मक बदलांसाठी अभियांत्रिकी सुधारणा, सुयोग्य वाहन तंत्रज्ञानाचा अवलंब, वाहतूकीच्या नियमांची अंमलबजावणी आणि या सर्व बाबींसाठी वर्तणूक बदल या चतुःसूत्रींवर आधारित परिपूर्ण काम होणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ते सुरक्षा विषयक बाबींच्या अंमलबजावणीसाठी महापालिका सदैव कटिबद्ध असून 'ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी'यासारख्या प्रकल्पांमुळे मुंबईतील रस्ते सुरक्षा अधिक परिणामकारक होण्यास चालना मिळेल'', असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले.
ते आज बृहन्मुंबई महापालिका व 'ब्लूमबर्ग इनिशिएटीव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी' यांच्या संयुक्त विद्यमाने वरळी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रस्ते सुरक्षा विषयक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी 'बेस्ट' उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख, सह पोलीस - आयुक्त (वाहतूक - मुंबई) मिलिंद भारंबे, ब्लूमबर्ग फिलॉन्थ्रॉपीजच्या संचालिका केली लार्सन, मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, महापालिकेच्या रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांच्यासह संबंधित संस्थांचे व विभागाचे मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रस्ते सुरक्षा विषयक बाबींची अंमलबजावणी ही प्राधान्याने चार पातळ्यांवर करणे आवश्यक असल्याचे प्रतिप्रादन केले. यामध्ये अभियांत्रिकी स्तरावरील बाबींची अंमलबजावणी करताना त्यामध्ये रस्ते व पदपथ यांचा सुयोग्य आकार व उंची, तसेच रस्त्यावरील 'क्रॉसींग आणि लेन' यांची सुयोग्य आखणी यांचा विचार होणे आवश्यक असल्याचे सांगितले. वाहन तंत्रज्ञान विषयक बाबींची अंमलबजावणी करताना गाडीच्या आरसा, सीटबेल्ट्स, एअर बॅग्ज यासारख्या बाबींचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता असल्याचेही मेहता यांनी सांगितले.
याप्रसंगी पुढे बोलताना महापालिका आयुक्त पुढे म्हणाले की, रस्ते सुरक्षा विषयक नियमनासाठी सर्वंकष स्वरुपाचे नियम व त्यांची परिपूर्ण अंमलबजावणी ही देखील रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे.त्याचबरोबर अभियांत्रिकी, वाहन तंत्रज्ञान व नियमन विषयक बाबी या सर्वांची परिपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी वर्तवणूक विषयक सकारात्मक बदल अतिशय आवश्यक असल्याचेही श्री. मेहता यांनी आजच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आवर्जून नमूद केले. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) संजय दराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता राजेंद्र इंगळे यांनी केले.


No comments:
Post a Comment