मुंबई, दि. 24 Aug 2016: आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी आरोग्य विभागामार्फत `डायल १०८` हे मोबाईल ॲप विकसीत करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आला.
मंत्रालयात आरोग्यमंत्र्यांच्या दालनात झालेल्या छोटेखानी झालेल्या कार्यक्रमास आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त प्रदीप व्यास, आरोग्य संचालक डॉ. मोहन जाधव यावेळी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य मंत्री म्हणाले की, आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी १०८ क्रमांक फिरविला की अत्याधुनिक रुग्णवाहिका काही मिनिटांतच पोहोचते. आतापर्यंत १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेच्या सेवेसाठी सुमारे एक कोटी लोकांनी कॉल केल्याची नोंद आहे. तत्काळ प्रतिसादाची ही सेवा असून १० लाख रुग्णांना जीवनदान या रुग्णवाहिकेमुळे मिळाले आहे. राज्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अधिक दर्जेदार सेवा मिळावी यासाठी विभागाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सध्या १०८ क्रमांकावर कॉल केल्यास शहरी भागात सुमारे १८ मिनीटात तर ग्रामीण २३ मिनीटात रुग्णवाहिका पोहोचते. ह्या मोबाईल ॲपमुळे रुग्णवाहिकेचा प्रतिसाद कालावधी दोन ते तीन मिनिटांनी कमी होण्यास मदत मिळणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या देखभाल दुरुस्तीची विशेष काळजी घेण्याचे आदेश देऊन आरोग्यमंत्री म्हणाले की, या रुग्णवाहिकांच्या दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागात एक मेंटेनन्स व्हॅन आहे त्यांची संख्या वाढवावी, टायर्स तसेच अन्य साधनसामुग्री वेळेवर उपलब्ध झाली पाहिजे, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
मोबाईल ॲपचे वैशीष्ट्य-
· डायल १०८ BVG MEMS Helpline calling हे ॲपॲन्ड्रॉईड मोबाईलसाठी गुगल प्ले स्टोर मधून डाऊनलोड करण्याची सुविधा
· मोठी शहरे, राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गावरील अपघातग्रस्तास वेळेवर रुग्णवाहिका देण्यासाठी तसेच अपघातग्रस्तांचे नेमके ठिकाण माहिती करण्यासाठी या ॲपचा उपयोग
· या ॲपवरून कॉलींगची तसेच टेक्स्ट एसएमएस पाठविण्याची सोय
· ॲप डाऊनलोड केल्यानंतर जवळच्या नातेवाईकांचे संपर्क क्रमांक आणि अन्य माहिती नोंदविण्याची सोय
· ॲपच्या होम पेजवर कॉलींग आणि एसएमएस चे बटन
· वैयक्तीक किंवा अन्य लोकांसाठी कॉलिंगची सुविधा
· ॲपच्या वापरकर्त्याने स्वताच्या वैद्यकीय मदतीसाठी १०८ क्रमांवर कॉल केल्यास अॅप मध्ये नातेवाईकांचा नोंदणी झालेल्या मोबाईलवर एसएमएस जाण्याची सुविधा
· कॉल किंवा मेसेज पाठविला गेल्यास १०८ च्या मध्यवर्ती केंद्रातील इमजर्न्सी रिस्पॉन्स ऑफीसरच्या संगणकावर कॉल केलेल्या व्यक्तीचे नाव, आणि त्याने ज्या ठिकाणाहून कॉल केला त्याचे लोकेशनची माहिती मिळते.
· ही माहिती मिळताच कॉल केलेल्या व्यक्तीच्या ठिकाणापासून जवळच्या अंतरावर असलेली १०८ क्रमांकसेवेची रुग्णवाहिका तात्काळ पाठविली जाते.

No comments:
Post a Comment