चौकशी करण्यासाठी राज्यपाल, एसीबी, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला पत्र
आंबेडकर भवनही बिल्डरांच्या घश्यात घालण्याची शक्यता
मुंबई / अजेयकुमार जाधव 19 Aug 2016
दादर येथील डॉ. आंबेडकर भवन पाडण्याचा खुले आम दावा करणारे सनदी अधिकारी व पिपल्स इमप्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार रत्नाकर गायकवाड यांनी एमएमआरडीए चे आयुक्त असताना अनेक बिल्डरांना शासकीय नियम धाब्यावर बसवून भूखंड दिले आहेत. या प्रकरणांची चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष, माजी सनदी अधिकारी उत्तमराव खोबरागडे यांनी केली आहे. याबाबत खोबरागडे यांनी राज्यपाल, लाच लुचपत विभाग, आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांना पत्र लिहिले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
रत्नाकर गायकवाड यांनी एमएमआरडीए चे आयुक्त असताना कांदिवली आकुर्ली येथील १० एकर जमीन किरण हेमानी या बिल्डरला एसआरए योजना राबवण्यास दिली आहे. अशी जमीन कोणतेही टेंडर ना काढता शासनाला देता येत नाही. या जमिनीची किंमत एक हजार कोटी रुपयांची आहे. हे प्रकरण समजताच कलेक्टर यांनी हि जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले परंतू या जमिनीवर मोठं मोठाले टॉवर उभे राहिल्याचे निदर्शनास आले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात एमएमआरडीएची एक १० एकर जमीन विपुल मेहता यांच्या नावे होती त्यांनी हि जमीन रितसर खरेदी केली होती. परंतू रत्नाकर गायकवाड यांनी श्रॉफ नावाच्या एका व्यक्तीशी संगनमत करून एका दिवसात एमएमआरडीएच्या कायदेविषय सल्लागारांनी दिलेला अभिप्राय बाजूला सारून पार्वती कौर या महिलेच्या नावे करण्यात आली. यासाठी एका दिवसात सर्व कागदपत्रे मंजूर करण्यात येऊन श्रॉफ नावाच्या व्यक्तीला गायकवाड यांनी फायदा करून दिला असे खोबरागडे यांनी सांगितले.
पीपल्स इमप्रुव्हमेंट ट्रस्टचे कथित सल्लागार रत्नाकर गायकवाड आणि त्यांचे मेहुणे विजय रणपिसे यांनी बृहन्मुंबई बहुजन पतपेढी स्थापन केली. या पतपेढीला झी टीव्हीचे मालक सुभाषचंद्र गोएल यांनी ५ लाख रुपये दिले आहेत. खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमलाहि एका बिल्डरने १ कोटी रुपये मदत केली आहे, बुद्धिस्ट रिव्हायव्हल ट्रस्टने शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून भूखंड मिळवून घरे देण्यासाठी १६ लाख रुपये जमविले आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुंबईत घरे देता न आल्याने नंतर हि रक्कम बुद्धिस्ट विपश्यना संस्थेच्या माध्यमातून पुण्याच्या चोरडिया नावाच्या बिल्डरला पकडून ३२ एकर जमीन घेतली असली तरी घरे अद्याप कोणाला मिळाली नाहीत. संस्था स्थापन करून बिल्डरांना जमिनी देण्याचा धंदा रत्नाकर गायकवाड आणि त्याचा मेव्हणा विजय रणपिसे करत आसल्याचा आरोप खोबरागडे यांनी केला आहे.
रत्नाकर गायकवाड आणि त्याचा मेव्हणा विजय रणपिसे आधी संस्था स्थापन करून भूखंड मिळवून बिल्डरांचे भले करत होते. त्याबदल्यात त्यांच्या संस्थांना बिल्डर आर्थिक मदत करत होते. आता गायकवाड आणि रणपिसे या दोघांनी संस्था स्थापन करण्याचे धंदे बंद केले आहेत. आता यां दोघांनी ज्या संस्थांकडे भूखंड आहेत त्या संस्था आपल्या ताब्यात घेण्याचे सुरु केले आहे. यातूनच पीपल्स इमप्रुव्हमेंट ट्रस्ट ताब्यात घेऊन आंबेडकर भवन पाडण्यात आले. गायकवाड, रणपिसे आणि इतर ट्रस्टी आंबेडकर भवनाचा भूखंडहि बिल्डरांच्या घश्यात घालण्याची भीती खोबरागडे यांनी व्यक्त केली आहे. रणपिसे हे एका बँकेमध्ये कामाला होते रत्नाकर गायकवाड यांच्यामुळेच मुंबईमधील एका नामांकित बिल्डरकडे त्यांना उपाध्यक्ष पदावर घेतले असल्याचे खोबारगडे यांनी सांगितले.
अस्मितेवर घाला घालणाऱ्यांना चोख उत्तर द्या
आंबेडकर भवन हि आंबेडकरी जनतेची अस्मिता आहे. या ठिकाणाहून बाबासाहेबांनी चळवळ देशभर पसरवली. प्रबुद्ध भारत याच ठिकाणाहून निघत होता. आज पर्यंत ना पाहिलेल्या कथित ट्रस्टींनी आपले समाजात योगदान नसताना आंबेडकर भवन पाडले आहे. आंबेडकर भवन पाडून या समाज कंटकांनी अस्मितेवर घाला घातला आहे. समाजाची जमीन बिल्डरला देण्याचा यांचा डाव असल्याने आंबेडकर भवनचा हा लढा न थांबवता असाच पुढे चालू ठेवायला हवा. आंबेडकरी जनतेच्या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आंबेडकरी जनता, राजकीय नेते व पक्षांनी एकत्र येऊन येत्या निवडणुकीत याचे चोख उत्तर द्यावे असे आवाहन उत्तमराव खोबरागडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment