मुंबई / प्रतिनिधी - प्रशासकीय सेवेत, राजकारणात, लेखन क्षेत्रात, शासकीय सेवेत ओबीसी समाज नेमका कुठे आहे. ओबीचा इतिहास कुठे आहे. आमचा इतिहास लिहिलाच गेला नाही.. आज आमचा ओबीचा वाटा कुठे हाय रं? असा सवाल या प्रस्थापित व्यवस्थेला विचारावा वाटतो, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.
कोेकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबईत बहूसंख्येने असणा-या कुणबी समाजाचा वेध घेणा-या प्रशांत डिंगणकर लिखित “कुणब्याचा गावगाडा” या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी परेल येथील शिरोडकर सभागृहात राज्याचे पुशसंवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. व्यास क्रियेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कुळे, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे, माजी अध्यक्ष चंद्रकांत बावकर, गुहागर शाखेचे अध्यक्ष अनंत साटले, पालशेत शाखेचे अध्यक्ष गजानन मांडवकर आदींसह मुंबईच्या उपमहापौर अलका केरकर, मनसेचे नगरसेवक संदिप देशपांडे, प्रकाशक निलेश गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी पुस्तकाचा वेध घेताना मुंबई भाजपा अध्यक्ष आमदर अॅड आशिष शेलार यांनी हे पुस्तक कुणबी समाजाला दिशा देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त् केला. तसेच कोकणातील बहूसंख्येने असणा-या कुणबी समाजाच्या संस्कृतीचा, भाषेचा, इतिहासाचा, खाद्य संस्कृतीचा या पुस्तकात नेमकेपणाने वेध घेण्यात आला असल्याचे त्यांनी नमूद केले. तर मंत्री महादेव जानकर यांनी ओबीसी समाजाच्या आजच्या परिस्थितीचा वेध घेत अशा प्रकारचे लेखन या समाजा विषयी होण्याची गरज असून हे पुस्तक त्या दुष्टीने महत्वाचे असल्याचे सांगितले. तर ओबीसीसाठी उत्पन मर्यादेची अट सहा लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे जाहीर करीत त्यांनी त्याचे जाहीर आभारही मानले. ओबीसी समाजाचा इतिहास लिहिला गेला नाही अशी खंत व्यक्त करीत या समाजा विषयी विविधांगी लेखन करण्याची गरज आहे. आपणही लिहिले असून अशा प्रकारचे लेखन झाल्यास या समाजाची विविध अंगे समाजासमोर येतील असेही त्यांनी नमुद केले.
तर डॉ. महेश केळुसकर यांनी या पुस्तकाचे कौतूक केले. कोकणातील कुणबी समाजाविषयी अनेक छोटी छोटी निरिक्षणे यामध्ये आहेत. अत्रेंच्या गावगाडा या पुस्तकाप्रमाणे हे पुस्तक कुणबी समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास ठरेल. पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने कुणबी समाजाच्या विविध संघटना एकवटल्या होत्या. त्यामुळे या व्यासपिठावरून कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांची चर्चाही या निमित्ताने झाली. चंद्रकांत बावकर यांनी आपल्या भाषणात समाजाचे प्रश्न मांडले तर तर ज्येष्ठ पत्रकार मुकुंद कुळे यांनी कुणबी आणि ग्राम्य संस्कृतीचा वेध घेतला. या कार्यक्रमात कुणबी कला मंच, नमन मंडळ, जाखडी नृत्य आणि ज्येष्ठ समाजसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार सुरेश ठमके यांनी तर आभार नीलेश गायकवाड यांनी मानले .


No comments:
Post a Comment