ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन - 3 सप्टेंबरला अंत्यसंस्कार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं निधन - 3 सप्टेंबरला अंत्यसंस्कार

Share This
मुंबई / प्रतिनिधी, दि. 1 :- ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद राव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. 3 सप्टेंबर रोजी दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शरद राव हे रिक्षा, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष म्हणूनही प्रसिद्ध होते. मुंबईत बेस्ट, रिक्षा, टॅक्सीचालकांचं संघटन करुन त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी लढा दिला. रिक्षा, टॅक्सीचालकांना योग्य ते भाडे, कामगारांना योग्य वेतन मिळावं, यासाठी त्यांनी अनेकवेळा रस्त्यावरची लढाई लढली.


शरद राव यांनी महानगरपालिका, फेरीवाला, रिक्षा चालक-मालक, टॅक्सी यासह विविध संघटनांचे नेतृत्व केलं होतं. प्रशासन आणि कामगार यांच्यातील दुवा म्हणून शरद राव हे काम पाहात. ग्राहकांवर दरवाढीचा भार पडू नये पण रिक्षा, टॅक्सी चालकांनाही योग्य भाडे मिळावं यासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. त्यांच्या निधनाने रिक्षा, टॅक्सीचालकांचा नेता हरपला अशी भावना व्यक्त होत आहे.

शरद राव यांच्या कन्या कॅनडाला असतात. त्या परवा सकाळी मुंबईला येतील. तोपर्यंत शरद राव यांचं पार्थिव शीत गृहात ठेवण्यात येईल. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत शरद राव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. आणि त्यांच्या जलनिधी सोसायटी, बांगुर नगर, लिंक रोडच्या बाजूला, गोरेगाव, पश्चिम,मुंबई येथील राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि 3 सप्टेंबर रोजी दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

प्रतिक्रिया
कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे लढाऊ नेतृत्व काळाच्या पडद्याआड -मुख्यमंत्री
मुंबई, दि. 1 : ज्येष्ठ नेते शरद राव यांच्या निधनाने संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीचे संघर्षशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केलीआहे. मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, बॉम्बे लेबर युनियनपासून आपल्या कामगार चळवळीला सुरुवात करणाऱ्या राव यांचा मुंबईतील कामगार क्षेत्रावर मोठा प्रभाव होता. महापालिका कर्मचारी, बेस्ट उपक्रम,फेरीवाला, रिक्षा चालक-मालक, टॅक्सी यासह विविध संघटनांचे नेतृत्व करताना राव यांनी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज उठवला. तसेच विविध आंदोलनांच्या माध्यमातून त्यांनी कामगारांचे प्रश्न व्यापक व्यासपीठावर मांडले. कामगारांच्या हिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जोपासणाऱ्या राव यांच्या निधनाने कामगार चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

हातावर पोट असणारा कष्टकरी कामगार पोरका झाला - धनंजय मुंडे
कामगार नेते शरद राव यांच्या निधनानं 'हातावर पोट असणारा कष्टकरी कामगार' आज पोरका झाला आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहीली. धनंजय मुंडे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शरद राव यांनी आपलं संपूर्ण जीवन कष्टकरी कामगारांच्या हक्कासाठी खर्च केलं. महापालिका, नगरपालिकांचे कर्मचारी, टॅक्सी व रिक्षाचालक, फेरीवाले, शेतमजूर अशा हातावर पोट असलेल्या गरीब कर्मचाऱ्यांनी त्यांना मनापासून आपले नेते मानले होते. त्यांच्या एका आवाहनावर विविध क्षेत्रातले लाखो कामगार आंदोलनात सहभागी होत होते. मुंबईसारख्या शहराची चाकं ठप्प करण्याची त्यांची ताकद होती. ही ताकद त्यांच्या कामगारप्रेमाची व संघटनकौशल्याची पावती होती. त्यांच्यासारखा कामगार नेता भविष्यात होणं शक्य नाही. अशा शब्दात मुंडे यांनाी त्यांना आदरांजली वाहिली.

सचिन अहिर
जॅार्ज फर्नांडीस यांच्या प्रमाणेच कामगार लढ्याच्या इतिहासातील सर्वात यशस्वी आंदोलनांचे एक अलौकिक नेतृत्व हरपले. त्यांच्या जाण्याने माझे व्यक्तीश: मोठे नुकसान झाले आहे. ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या निधनाने कामगार चळवळीतील बिनीचा शिलेदार गमावला -
सचिन अहिर अध्यक्ष राष्ट्रवादी कोंग्रेस, मुंबई


गरीब,कष्टकरी कामगार पोरका झाला


कामगार नेते शरद राव यांच्या निधनाने गरीब,कष्टकरी आणि तळागाळातील कामगार आज पोरका झाला आहे, अशा शब्दांत कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी राव यांना श्रद्धांजली वाहिली. निलंगेकर आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शरद राव यांनी आयुष्यभर कष्टकरी, महापालिका व नगरपालिका कामगार,टॅक्सी व रिक्षाचालक, फेरीवाले, शेतमजूर यांच्या हक्कांसाठी लढा दिला. कामगार चळवळीत त्यांनी दिलेले योगदान विसरता न येणारे आहे.


एकमेव लढवय्ये नेतृत्व संपले
ज्येष्ठ कामगार नेते शरद राव यांच्या दु:खद निधनामुळे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील कामगार चळवळीची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दांत विधानपरिषदेचे उप सभापती माणिकराव ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली. ठाकरे आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, राव यांनी संघटीत आणि असंघटीत कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मुंबईतील कामगार अथवा कष्टकऱ्यांचे आंदोलन म्हणजे शरद राव असे जणू समीकरणच बनून गेले होते. उत्तम संघटक कौशल्य, प्रभावी वक्तृत्व आणि श्रमजीवींच्या उन्नतीचा ध्यास ही शरद राव यांच्या जीवन कार्याची त्रिसूत्री होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages