रामदास आठवले हे सामान्यांसाठी लढणारे नेते – मुख्यमंत्री - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रामदास आठवले हे सामान्यांसाठी लढणारे नेते – मुख्यमंत्री

Share This
मुंबई, दि. 1 : समाजातील सामान्य माणसांच्या व्यथा मांडून त्या सोडविण्यासाठी संघर्ष करण्याचे काम केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. पदाचा, मानाचा अभिनिवेश न बाळगता जमिनीवर राहून कार्य करणारे ते नेते आहेत. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे काढले.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री झाल्याबद्दल आठवले यांचा सपत्निक नागरी सत्कार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार राहुल शेवाळे, रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष भूपेश थुलकर, माजी सुमंतराव गायकवाड, सचिव अविनाश महातेकर, राजाभाऊ सरवदे, आठवले यांच्या पत्नी सीमाताई आठवले, मुलगा जीत आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, रामदास आठवले यांनी नेहमीच स्वत:पेक्षा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या हितासाठी काम केले आहे. त्यांनी नेहमीच अन्यायाविरुध्द आवाज उठविला. त्यासाठी त्यांनी कधीही जात, धर्म, पक्ष याची तमा बाळगली नाही. एक उत्तम नेते असण्याबरोबरच ते एक उत्तम व्यक्तीही आहेत.

फडणवीस पुढे म्हणाले की, राज्य शासन समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी नेहमीच कार्यरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथील स्मारक, लंडन मधील डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेले घर खरेदी, नागपूरमधील दीक्षा भूमी आंतरराष्ट्रीय दर्जाची करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. या सर्व निर्णयांना आठवले यांनी नेहमीच सक्रिय पाठींबा दिला.

आठवले म्हणाले की, नागरी सत्कारांपेक्षा काम करण्यावर मी भर देणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंत्री पदाचा वापर करणार आहे. जाती जातीतील भेद संपविण्यासाठी आंतरजातीय विवाह हा चांगला पर्याय असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणार आहे. अशा विवाहांसाठी देण्यात येणारी 2.50 लाख रुपयांची मदत वाढवून तीन लाख करण्याचे विचाराधीन आहे.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. दलित अत्याचार प्रतिबंध कायदा रद्द करता येणार नाही. मात्र त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असेही आठवले यांनी सांगितले. शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, आठवले यांच्या मंत्री पदामुळे देशभरातील मागासवर्गीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अन्यायाविरुध्द लढणारा हा नेता आहे. यावेळी खासदार शेवाळे, थुलकर, महातेकर यांचीही भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages