अग्निशमन भरती प्रक्रिया वादात - भरतीत दोनशेवर उमेदवार जखमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अग्निशमन भरती प्रक्रिया वादात - भरतीत दोनशेवर उमेदवार जखमी

Share This
मुंबई - मुंबई अग्निशमन दलातर्फे बोरिवली केंद्रात सुरू असलेली भरती प्रक्रिया वादात येण्याची दाट शक्यता आहे. धावण्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून बोरिवली केंद्रात 20 फुटांवरून उडी मारण्याची चाचणी घेतली जात आहे. ही चाचणी चुकीच्या पद्धतीने घेतल्याने आतापर्यंत दोनशेहून जास्त उमेदवार जखमी झाले आहेत. त्यातले बहुतांश उमेदवारांना जबर मार बसलाय, काहींचे पाय फ्रॅक्चर आहेत, काहींना हातापायासह कंबरेला मुका मार बसलाय. हे सर्व उमेदवार सध्या कांदिवलीच्या शताब्दी रूग्णालयात उपचार घेत आहेत. यातली धक्कादायक बाब ही की अग्निशमन दलाने हात वर केलेत. जाहिरात देतानाच भरती प्रक्रियेत जखमी झालात तर आमची जबाबदारी नाही, असे स्पष्ट केल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

बोरिवली केंद्रात मुंबई अग्निशमन दलातर्फे 774 पदांसाठी भरती सुरु आहे. या भरतीसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून 14 ते 15 हजार उमेदवार बोरिवली केंद्रात दाखल झालेत. धावणीत उत्तीर्ण झालेल्यांचे शारिरिक मोजमाप झाले. त्यातही पास झालेल्यांची 20 फुटांवरून खाली उडी मारण्याची चाचणी केंद्रात सुरू आहे. या चाचणीत उडी मारणार्‍या उमेदवाराला अग्निशमन दलाचे जवान ताडपत्रीत झेलतात. पण ताडपत्री चुकीच्या पद्धतीने पकडल्याने अनेक उमेदवार खाली जमिनीला आपटलेत. धक्कादायक बाब ही एक दोन उमेदवार जखमी झाल्यानंतरही अग्निशमन दलाने या चाचणीत सुधारणा न करता, काळजी न घेता त्याच पद्धतीने चाचणी पुढे सुरू ठेवली. त्यातून जखमींचा आकडा वाढत गेला. धुळयाच्या शिरोड या ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेला दिपक पाटील (23) सध्या शताब्दी रूग्णालयात उपचार घेत आहे. त्याचा पायाला फ्रॅक्चर आहे. त्याच्या पायात सळया टाकाव्या लागणार आहेत. दिपकने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेनुसार उडी मारल्यानंतर मी ताडपत्रीत झेलला गेलो. पण त्याच वेगाने जमिनीलाही आपटलो. आपटल्यानंतर पायात प्रचंड वेदना झाल्या. मी तिथल्या अधिकार्‍यांना सांगितले. पण दिड ते दोन तास त्यांनी माझ्याकडे लक्षच दिले नाही. त्यानंतर मला शताब्दी रूग्णालयात आणण्यात आले. एक्सरे काढला तेव्हा पाय फ्रॅक्चर असल्याचे समजले. या उपचारांसाठी 15 हजार रूपये खर्च अपेक्षित असल्याचे रूग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. पोलीस दलात भरती होण्याची इच्छा उराशी बाळगून असलेल्या दिपकला आता यापुढे मैदानी देणे कठिण जाईल. कदाचित तो या मैदानी परिक्षांना मुकूही शकेल, अशी खंत त्याच्या वडलांनी व्यक्त केली. दिपकप्रमाणे अनेक जखमी शताब्दीत आणण्यात आले. पण एक्सरे रिपोर्ट उमेदवार किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या हाती दिला गेला नाही. उमेदवार, त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या दाव्यानुसार रूग्णालयात दाखल करून घेण्यासही टाळाटाळ केली गेली. वाद घातल्यानंतर रूग्णालयात जागा मिळाली. एक्सरे केल्यानंतर तात्पुरते प्लास्टर घालण्यात आले. अग्निशमन दलाने उपचारांचा खर्च करण्यास थेट नकार दिल्याने अनेक जखमी आपापल्या गावी उपचारांसाठी निघूनही गेले.

भरतीप्रक्रिये दरम्यान विविध शारीरीक चाचणीत किरकोळ जखमींची 195 इतकी आकडेवारी आहे. फक्त उंच उडी मारतानाच उमेदवार जखमी झाल्याचा दावा ख़ोटा आहे. जखमींवर शताब्दी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतात. भरती प्रक्रियेत काही दुखापत घडल्यास त्याला आम्ही जबाबदार नसल्याचे जाहिरातीत आमच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांना या शारिरिक चाचणीला वर्षानुवर्षे सामोरे जावे लागते. अग्निशमन दलाच्या जवानांना दुर्घटनेच्यावेळी उंचावर जाऊन माणसांची सुटका करावी लागते. जर एखादयाला उंचीची भिती असेल तर अग्निशमन दलात कसे काम करु शकणार, असा सवाल अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे करतात. तसेच दिपक नावाच्या उमेदवाराच्या शस्त्रक्रियेबाबत अदयाप मला अहवाल मिळाला नाही. आमच्यापरीने त्याला सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. तसेच जे उमेदवार उत्तीर्ण झाले व जखमी झाले आहेत त्यांना पुढील परिक्षेसाठी एक महिन्याचा अवधी आहे त्यामुळे ते यात ग्राह्य धरले जाणार असल्याचे रहांगदळे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages