अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यास शासनाची मंजूरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2016

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यास शासनाची मंजूरी

मुंबई, दि.7 : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन आयुक्तालय स्तरावरुन उपकोषागार कार्यालय, कोकण भवन येथून गोषवारा पध्दतीने एकत्रित आहरित करुन PFMS (Public Financial Management System) या प्रणालीद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास शासनाने मंजूरी दिली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

मंत्री मुंडे म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वेळेत मिळण्यासाठी व मानधन वाटप कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी PFMS प्रणालीद्वारे मानधन प्रदान करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनानेही अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन PFMS याच प्रणालीद्वारे करण्याबाबत सुचित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

आयुक्तालय स्तरावर राज्यातील सर्व प्रकल्पातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची एकत्रित हजेरी व त्याद्वारे देयक तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करण्यासाठी आयुक्तालयाने Yes Bank च्या मदतीने संगणक प्रणाली (Software) विकसीत केले आहे. या विकसीत केलेल्या प्रणालीसही मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्तालयाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये राज्यातील सर्व सेविका, मदतनीस यांनी नावे, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आहरण व संवितरण अधिकारी यांची माहिती अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून PFMS प्रणालीद्वारे मानधनाची रक्कम सेविकांच्या खात्यात थेट जमा करण्याची पध्दत पूर्ण राज्यात लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS