झोपडपट्टींपेक्षा इमारतींच्या परिसरात डेंग्यू पसरविणा-या डासांची उत्पत्तीस्थाने चार पटीने अधिक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2016

झोपडपट्टींपेक्षा इमारतींच्या परिसरात डेंग्यू पसरविणा-या डासांची उत्पत्तीस्थाने चार पटीने अधिक

जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची संयुक्त तपासणी
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात डेंग्यू व मलेरिया विषयक प्रतिबंधात्मक कार्यवाही करताना महापालिकेद्वारे जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत संयुक्त स्वरुपात ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान झोपडपट्टी परिसरात 'एडिस एजिप्ताय' डासांची १,८२८ उप्तत्तीस्थाने आढळून आली आहेत. तर इमारतींच्या परिसरात ७,११८ उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. याचाच अर्थ झोपडपट्टी परिसरांच्या तुलनेत इमारतींच्या परिसरात सुमारे एडिस एजिप्ताय डासांची उत्पत्तीस्थाने तब्बल चार पटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती महापालिकेचे कीटक नियंत्रण अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा व त्यांच्या प्रसारास प्रतिबंध व्हावा यासाठी महापालिकेद्वारे विविध उपाययोजना नियमितपणे करण्यात येत आहे. मात्र, सोसायटींच्या परिसरात किंवा घरांच्या आतमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने तयार होऊ नयेत, यासाठी नागरिकांनी अत्यंत सजग राहून महापालिकेद्वारे वेळोवेळी दिल्या जाणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे अतिशय आवश्यक असल्याचेच नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे.

डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणारे डास साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच प्रजोत्पादन करतात. तसेच या डासांच्या पाण्यातील अवस्था या आठ दिवसांच्या असतात. या दोन्ही बाबी लक्षात घेऊन आपल्या घरातील पिंप, ड्रम, बादल्या, पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवड्यातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलावे. तसेच कोरडी केलेली भांडी स्वच्छ कपड्याने दाब देऊन पुसून घ्यावीत जेणेकरुन भांड्यांच्या कडांना चिकटलेली डासांची अंडी नष्ट होतील. तसेच आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे देखील आवश्यक आहे, अशीही माहिती श्री. नारिंग्रेकर यांनी दिली आहे.

जानेवारी ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत महापालिकेच्या चमूंद्वारे ७४ लाख ७८ हजार ५५६ घरांची मलेरिया, डेंग्यूच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. यामध्ये काही घरांना आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक वेळा भेटी देण्यात आल्या, त्यांचाही समावेश आहे. या पाहणी दरम्यान ८० लाख २० हजार कंटेनर्स देखील तपासण्यात आले. या तपासणी दरम्याने ८ हजार ९४६ ठिकाणी एडिस डासांची उत्पतीस्थाने आढळून आली. या ८ हजार ९४६ उत्पत्तीस्थानांपैकी १,८२८ ठिकाणे ही झोपडपट्टी परिसरातील आहेत. तर ७,११८ ठिकाणे ही इमारती / सोसायटी यांच्या परिसरातील आहेत. याबाबत महापालिकेद्वारे १३,५९३ नोटीस देण्यात आल्या. तर ९२७ प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. याच आठ महिन्यांच्या कालावधी दरम्यान २६ लाख ९२ हजार रुपये एवढा दंड कायदेशीर प्रक्रियेनुसार वसूल केला आहे.

घरी येणार्या पालिका अधिकार्याना सहकार्य करा
आपल्या घरी डेंग्यू व मलेरिया विषयक तपासणीसाठी महापालिकेचे पथक आल्यास ते आपल्याला मदत करण्यासाठीच आहे, याची जाणीव ठेवून त्यांना आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन नारिंग्रेकर यांनी केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS