ट्रायमॅक्‍सला बेस्टची मुदतवाढ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ट्रायमॅक्‍सला बेस्टची मुदतवाढ

Share This
मुंबई - बेस्टच्या इलेक्‍ट्रॉनिक तिकिटे देणाऱ्या यंत्रांसाठी (ईटीआयएम) "बीओटी‘ तत्त्वावर ट्रायमॅक्‍स आयटी इन्फ्रास्ट्रक्‍चर ऍण्ड सर्व्हिसेस लि. या कंपनीला दिलेल्या कंत्राटाची मुदत 31 ऑगस्टला संपली आहे. ऐनवेळी बेस्ट समितीच्या बैठकीत शुक्रवारी निविदा न मागवता मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला होता. कंपनीने बेस्टला सुमार दर्जाची सेवा दिल्यामुळे तिला काळ्या यादीत टाका, अशी मागणी करत कंपनीला मुदतवाढ देण्यास विरोधी पक्षांच्या सदस्यांनी कडाडून विरोध केला.
ट्रायमॅक्‍सने ही यंत्रे पाच वर्षे बेस्टला पुरवली. कंपनीने बेस्टला साडेसात हजार यंत्रे दिली होती. त्यातील बहुतेक नादुरुस्त झाली. करारानुसार मुदत संपल्यानंतर ही यंत्रे कंपनीने बेस्टला हस्तांतरित करायला हवी होती. त्यांच्या वापरासाठी बेस्टने यंत्रणा उभी करण्याची गरज होती. मात्र तसे न करता बेस्टने कंपनीला कोट्यवधी रुपये देऊन कंपनीला मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने आणला आहे. हा नागरिकांच्या पैशाचा अपव्यय आहे, असा आरोप ज्येष्ठ सदस्य रवी राजा यांनी केला. या कंपनीने दिलेली सेवा चांगली नव्हती. त्यामुळे तिला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी त्यांनी केली. ग्लोबल निविदा मागवा, प्रस्ताव न आणता मुदतवाढीसाठी कंपनीला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणीही त्यांनी केली. 

ट्रायमॅक्‍सची दररोज तीनशे ते चारशे यंत्रे बंद पडत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा, या कामासाठी स्पर्धात्मक निविदा मागवा, अशी मागणी मनसेचे केदार हुंबाळकर यांनी केली.  शिवसेनेचे सुनील गणाचार्य यांनीही या कंपनीला मुदतवाढ देण्यास विरोध केला. विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी मुदतवाढीला कडाडून विरोध केला. बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी ट्रायमॅक्‍सला मुदतवाढ देण्याबाबत अपरिहार्यता व्यक्त केली. अखेर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यासाठी बहुमताने मंजुरी मिळाली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages