मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मु्स्लिम समाजाची एकजूट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मु्स्लिम समाजाची एकजूट

Share This
मुंबई / प्रतिनिधी, दिनांक 26 Sep 2016
मु्स्लिम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधींनी एकजूट करण्यास सुरुवात केली आहे.मरीन लाईन्स येथील इस्लाम जिमखाना येथे आज झालेल्या बैठकीला विविध पक्षांतील मुस्लिम आमदारांनी उपस्थित राहून मु्स्लिम आरक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या मोर्च्याप्रमाणे मुस्लिम समाज देखील एकत्र येत असल्याची चिन्हे दिसत आहेत. आरक्षणाबाबत समाजात जनजागृती निर्माण करुन समाजाला सक्रिय करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आसिम आझमी यांनी पुढाकार घेत आज इस्लाम जिमखाना येथे मुस्लिम समाजातील विचारवंत व लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. या बैठकीला कॉंग्रेसचे माजी मंत्री आमदार आरिफ नसीम खान, आमदार अमिन पटेल, एमआयएम चे आमदार अॅड वारिस पठाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक हारुन खान, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड सय्यद जलालुद्दीन, मौलाना मेहमूद दर्याबादी, मौलाना अतहर अली, मौलाना एजाज कश्मिरी, अमन कमिटीचे फरीद शेख, मौलाना अब्दुल सलाम सल्फी, असगर हैद्री, अॅड अब्बास काझमी

यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी व विचारवंतांनी हजेरी लावली. या प्रमुख नेत्यांच्या व मौलानांची एक समिती स्थापन करण्यात आली असून या समितीद्वारे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे आमदार अबू आसिम आझमी म्हणाले. मुंबई व राज्यात सर्वत्र फिरुन मुस्लिम समाजातील विचारवंत, मौलाना, सर्वपक्षीय व स्वयंसेवी संघटनांना मुस्लिम आरक्षणाची माहिती देऊन आरक्षणाच्या मागणीची आवश्यकता समोर आणण्यात येईल, मुस्लिम समाजाच्या आरक्षणावर सरकारने याबाबत त्वरित दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली, अशी माहिती समाजवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अब्दुल कादिर चौधरी यांनी दिली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी व विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या सध्या सुरु असलेल्या मोर्च्याप्रमाणे मोर्चे काढण्याबाबत सध्या निर्णय झालेला नसून. आगामी काळात याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages