डिजिटल ग्रामपंचायती करण्यासाठी ह्युलेट-पॅकर्ड सहकार्यास उत्सुक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डिजिटल ग्रामपंचायती करण्यासाठी ह्युलेट-पॅकर्ड सहकार्यास उत्सुक

Share This
मुंबई, दि. 20 : राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या महानेट या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमात सहयोग देण्याची तयारी ह्युलेट-पॅकर्ड या जगप्रसिद्ध कंपनीने दर्शविली असून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली.
मुख्यमंत्री फडणवीस सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून त्याअंतर्गत त्यांनी ह्युलेट-पॅकर्ड या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनीच्या सॅन फ्रॅन्सिस्को येथील कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी ह्युलेट-पॅकर्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेग व्हाईटमन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. महाराष्ट्र सरकार राज्यातील 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्यासाठी महानेट हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र डिजिटल सक्षम करण्याचा सरकारचा निर्धार आहे. त्यामुळे ग्रामपातळीपर्यंतचे प्रशासन गतिमान आणि पारदर्शक होणार आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करणे शक्य होणार असून ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने करावयाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची तयारी ह्युलेट-पॅकर्ड कंपनीने दाखविली आहे. त्याबाबत यावेळी व्हाईटमन यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.

युएस इंडिया बिझनेस कौन्सिलचे ऊर्जा धोरणविषयक संचालक नॉल्टी थेरिऑट यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या भेटीत राज्यात उद्योगसुलभतेसाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी थेरिऑट यांना माहिती दिली. तसेच अहाना रिन्युएबल्सचे व्यवस्थापकीय संचालक जेसन तायी यांच्याशीही मुख्यमंत्र्यांची भेट झाली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages