अँट्रॉसिटी कायदा म्हणजे संरक्षण कवच - भीमराव जामुने - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अँट्रॉसिटी कायदा म्हणजे संरक्षण कवच - भीमराव जामुने

Share This
मुंबई : अँट्रॉसिटी कायदा मराठा किंवा कोणत्याही सवर्ण समाजाविरुद्ध नाही. अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी अँट्रॉसिटी कायदा आहे. आजही अनुसूचित जाती जमातीवरील वाढत्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम हा कायदा करीत आहे. अँट्रॉसिटी कायदा म्हणजे अनुसूचित जाती - जमातींच्या समाजाला संरक्षण कवच असल्याचे मत अँट्रॉसिटी अँक्ट बचाव कृती समितीचे निमंत्रक राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते भीमराव जामुने यांनी केले.
कोपर्डीच्या निंदनीय घटनेचा आम्ही निषेध केला आहे. त्यातील आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी सर्व पुरोगामी संघटनांनी आंदोलन केले आहे. तरीही कोपर्डीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चातून अँट्रोसिटी रद्द करण्याची मागणी झाली आहे. कोपर्डीतील नराधम आरोपींची जात पुढे आणली जात आहे, मात्र अशा नराधमांना जात नसते. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांवर अगणित वेळा अत्याचार झाले, मात्र आम्ही कधी कोणत्याही समाजाविरुद्ध आंदोलन केले नाही. आंदोलन झाले ते फक्त आरोपींविरुद्ध. अनुसूचित जाती जमातीमधील लोकांनी कधीच आरोपीच्या संपूर्ण जातीविरुद्ध आंदोलन केले नाही. त्यामुळे कोपर्डीच्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून मराठा आणि अनुसूचित जाती जमातीच्या समजामध्ये दरी वाढविण्याचे प्रयत्न असतील तर ते रोखले पाहिजेत, त्यासाठी अनुसूचित जाती-जमाती समाजातील उच्च दर्जाच्या अधिकार्‍यांना एकत्र करून याबद्दल समाजामध्ये जागृती करणे गरजेचे आहे. अनुसूचित जाती-जमाती आणि सवर्ण मराठा समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, असे मत जामुने यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages